Home यवतमाळ निस्वार्थ सेवाकार्य करणाऱ्या संस्थांची गरज – विनायक दाते यांचे प्रतिपादन

निस्वार्थ सेवाकार्य करणाऱ्या संस्थांची गरज – विनायक दाते यांचे प्रतिपादन

334

पपिताताई माळवेंना एस एल फाउंडेशनचा श्रमसंस्कार पुरस्कार

यवतमाळ (प्रतिनिधी) ता. वाढत्या समस्या आणि प्रश्ने बघता समाजात निस्वार्थपणे सेवा कार्य करणाऱ्या संस्थांची आज गरज असुन दुदैवाने ही संख्या रोडावत चालली आहे. पारधी समाजातील ४१ मुलींचे सांभाळ करणाऱ्या आम्ही साऱ्या सावित्री या आश्रयालयातील सेवाकार्य कल्पनाशक्ती पलिकडचे आहे. अशा उपेक्षित व दुर्लक्षित संस्थांच्या मदतीसाठी प्रयत्नरत असलेल्या एस एल फाउंडेशनचे मदतकार्य देखील उर्जादायी असल्याचे अध्यक्षीय मत वाणिज्य ट्रस्टचे अध्यक्ष विनायकराव दाते यांनी व्यक्त केले.
एस एल फाउंडेशनच्या चौथ्या श्रमसंस्कार पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी वाघाडीत असलेल्या या आश्रयालयातील मुलींना आपल्या शिक्षणसंस्थेत मोफत शिक्षणासह शक्य ते सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. सु. ल. देशपांडे सरांच्या स्मृतीनिमीत्ताने आणि महिला दिनाच्या औचित्याने रविवारी दाते काँलेजमधील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने तसेच बाबाजी दाते आणि सु. ल. देशपांडे यांच्या प्रतिमांचे पुष्पवंदना करुन झाली. कार्यक्रमाचे उद्घाटक उपप्राचार्य डाँ. ताराचंद कंठाळे यांनी आपल्या भाषणातुन वाघाडीतील आश्रयालयाचे आणि एस एल फाउंडेशनच्या सेवाकार्याने कौतुक केले. समाजात सेवाकार्याचा मेकअप आजन्म टिकतो तो विस्मृतीत जात नसल्याचे विषद करुन त्यांनी या उपक्रमात स्वयंस्फुर्तपणे सहभागी होण्याचा संकल्प केला. मुख्य अतिथी असलेले सिने रसिक मंचचे अध्यक्ष यशवंत बापु पाटील यांनी देखील सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा मेळ असलेल्या श्रमसंस्कार व सुल सरगम कार्यक्रमाला शुभेच्छा देत भविष्यात दोनही संस्थांच्या उपक्रमांमध्ये सहर्ष सक्रिय राहण्याचा मानस व्यक्त केला.
न शा पवार यांनी आश्रयालयाचा प्रतिकुल परिस्थितीतील प्रवास आपल्या भाषणातुन उलगडुन देत येथे झटणाऱ्या माळवे दांम्पत्याच्या त्यागवृत्तीचा पुरस्कार केला. यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या श्रमसंस्कार पुरस्काराच्या मानकरी पपिताताई ईसुभाऊ माळवे यांचा उपस्थित सर्व मान्यवरांनी साडी चोळी, पुस्तक, रोख ५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, फुलाचे झाड प्रदान करुन गौरव केला. यावेळी मंचावर असलेले एस एल फाउंडेशनचे श्री संजय चकुले यांनी सपत्नीक आपल्या मुलीच्या स्मृतीनिमीत्त आश्रयालयातील मुलीचे वार्षिक पालकत्व स्विकारुन त्यांना ५ हजार रुपयांची शिष्यवृत्तीची सानुग्रह राशी प्रदान केली.
तृप्ती पाळेकर यांनी प्रास्ताविकातुन एस एल फाउंडेशनने चार वर्षात केलेले सेवाकार्य विषद केले. वैशाली पाटणे यांनी अतिथी व सत्कारमुर्तींच्या सेवाकार्याचा उपस्थितांना परिचय करुन दिला. प्रचिती काळे यांनी सुत्रसंचालन केले तर स्वाती गुजलवार यांनी आभार मानले. आयोजनाकरिता वैशाली कापसे, वीणा गुल्हाने, कल्पना मोरे, सविता ढाले, जया पराळे, योगीता गुल्हाने, अनघा गोलावार, सुनिता विनोद येकुंडवार, दिपाली अश्विन सवालाखे, आराधना दिनेश विडुळकर, आरती संजय चकुले, रिना नितीन हेमने, अतुल टाके, अविनाश बोबडे, मंगेश शेटे, आशिष हिंगलासपुरकर, विलास लोहकरे, प्रकाश कांबळे, मंगेश आजने, बाबुसिंग राठोड, अरविंद गंडाईत, मेहुल वाघेला, गोपाल काळे, आशिष मिश्रा, उमेश शर्मा आदींनी सहकार्य केले.
—————
*सिने रसिक मंचचे सेवा दातृत्व*

यावेळी सिने रसिक मंच प्रस्तुत सुल सरगम ही विशेष संगीत संध्या पार पडली. मंचच्या सदस्यांसह सारेगामा फेम गीत बागडे आणि तिच्या वडीलांनीही मंचावरील सुरेल गीत गायनाने उपस्थितांची मने जिंकली. सिने रसिक मंचच्या सदस्यांनीही आश्रयालयाकरिता आर्थिक सहकार्य करित आपल्या सेवा दातृत्वाची ओळख करवुन दिली. कार्यक्रमात केवळ मोहंमद रफी आणि लता मंगेशकर यांची गाणी सादर करण्यात आली.
————–
*अभ्यासदौरा ते गुरुवंदना…*

एस एल फाउंडेशनने एका महिन्यातच तीन सामाजिक उपक्रमाचा संकल्प केला होता. नागपूरात अँडव्हाँन्टेज विदर्भ या औद्योगिक महोत्सवात अभ्यासदौरा व बाहेरगावातील सदस्यांचा स्नेहमिलन सोहळा केडीके महाविद्यालयात आटोपला. श्रमसंस्कार व सुलसरगम कार्यक्रमानंतर गुढीपाडव्याला गुरुवंदना उपक्रमांतर्गत वाघाडीतील आश्रयालयात धान्य, क्रिडा साहित्य, पुस्तके आदी मदतकार्य करुन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. येथेच वार्षिक सर्वसाधारण सभा आटोपुन संस्थेच्या ४ वर्षातील सेवाकार्याच्या घडिपत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.