
- 10 दिवसांपूर्वीच कुटुंबात साजरा झाला होता मंगल सोहळा
विनोद पत्रे ,
चंद्रपूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दुर्गापूर येथे रात्रीच्या सुमारास भीषण घटना घडली असुन धुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्त असे की, काल दिनांक 12 जुलै रोजी रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने कुटुंबियांनी घरातील जनरेटर सुरू केले मात्र घराची दारे खिडक्या बंद असल्याने जनरेटर चा धूर घरात कोंडला गेला. त्यासोबतच जनरेटर चा धूर व त्यामुळे निर्माण झालेली वायु गळती ह्यामुळे घरात विषारी वायु पसरला.
ह्या दुर्घटनेत घरातील 7 लोक बेशुद्ध पडले त्यापैकी रमेश लष्कर – 45, अजय लष्कर – 21, लखन लष्कर – 10, कृष्णा लष्कर – 8, पुजा लष्कर – 14, माधुरी लष्कर -20 ह्यांचा मृत्यु झाला असुन 1 इसम गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
शेजाऱ्यांना काहीतरी अप्रिय घटना घडल्याचा संशय येताच त्यांनी आरडाओरड सुरू केली व पोलिसांना घटनेची माहिती दिली. वर्दी मिळताच ठाणेदार स्वप्निल धुळे ह्यांनी स्वतः पोलीस पथक घेऊन घटनास्थळ गाठले व घराचे दरवाजे तोडुन आत प्रवेश केला व लष्कर कुटुंबियांना तत्काळ डॉ. विश्वास झाडे ह्यांच्या दवाखान्यात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यापैकी 6 लोकांचा मृत्यु झाल्याचे घोषित केले तर 1 अत्यवस्थ असल्याचे कळले आहे.
जवळपास 10 दिवसांपूर्वीच ह्या कुटुंबात मंगल कार्य झाले होते मात्र अचानक काळाने घाला घातल्याने कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत झाल्याने परिसरात शोक व्यक्त होत आहे.











































