Home नांदेड फटाके विक्रेत्यांच्या धमाक्यापुढे प्रशासनाचा बार फुसका , “ना हरकत प्रमाणपत्र न घेताच...

फटाके विक्रेत्यांच्या धमाक्यापुढे प्रशासनाचा बार फुसका , “ना हरकत प्रमाणपत्र न घेताच थाटली दुकाने”

182

नांदेड :- ( प्रशांत बारादे ) – दिवाळी निमित्त फटाके दुकानांवर महापालिकेकडून तात्पुरत्या स्वरुपात परवानगी मिळाली असल्याचे बोलले जात असून जिल्हाधिकारी यांच्याकडून अंतिम परवानगी मिळाली नाही तरीही हिंगोली गेटजवळील गुरुद्वारा बोर्डाच्या जागेत 50 विक्रेत्यांनी बिनधास्तपणे दुकाने थाटली आहेत. यात धक्कादायक बाब म्हणजे सोमवारी एका दुचाकी चालकाने आपल्या सोबत गॅस सिलेंडर घेऊन दुकानांच्या परिसरात फेरफटका मारला यावेळी एखादी अप्रिय घटना घडली असती तर काय झाले असते, वाचा विचार करुन अंगावर शहारे येत आहेत. दरम्यान या विना परवानगी फटाके दुकानदारांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्याकडे पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी केली आहे.

दरवर्षी दिवाळी निमित्त शहरातील दोन ते तीन ठिकाणी फटाक्यांची दुकाने थाटली जातात यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदान,पॉलिटेक्नीकल कॉलेज मैदान व हिंगोली गेट येथील गुरुद्वारा बोर्डाच्या जागेवर या फटाके दुकानांना महापालिका व जिल्हाधिका·यांकडून रितसर परवानगी दिली जाते. परंतू काही कारणास्तव कृषी उत्पन्न बाजार समितीची यंदा जागा मिळाली नाही. त्यामुळे हिंगोली गेट येथील जागेवर फटाक्यांची दुकाने टाकण्यात आली आहेत. यासाठी महापालिका,प्रदूषण नियंत्रण मंडळ,अग्निशमन या विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते फटाके दुकानांना परवानगीसाठी महापालिकेच्या मालमत्ता, नगररचना, संबंधित झोन कार्यालय विधी विभाग यांच्याकडून प्रस्ताव जातो यानंतर प्रक्रिया पूर्ण करुन हिंगोली गेट येथे 50 दुकानांसाठी ग्रीन सिग्नल दाखवत जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्याकडे मनपाने अंतिम परवानगीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. परंतु जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी मिळाली नाही. तरीही ही परवानगी मिळण्यापूर्वीच विक्रेत्यांनी बिनधास्तपणे फटाके दुकाने थाटली आहेत व परिसरात सुरक्षिततेच्या अजून कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे विक्रेते ,ग्राहक व परिसरातील लोकांचे जीव धोक्यात आला आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे सोमवारी दुचाकीचालकाने आपल्या सोबत गॅस सिलेंडर सोबत घेऊन दुकाने परिसरात फेरफटका मारल्याचे दिसून आले. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड,शशिकांत गाढे पाटील,प्रशांत बारादे,नकुल जैन यांनी तक्रार केली आहे. गुरुद्वारा बोर्डाच्या जागेत संबंधित विभागाची परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र सवाल उपस्थित करुन संबंधित फटाके विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीने केली आहे. दरम्यान मनपाने फटाके दुकानदारांना कोणाच्या दबावाखाली अथवा शिफारशीमूळे घाईने परवानगी दिली का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

तहसीलदार तपासणी अहवाल केंव्हा देणार

हिंगोली गेट येथील फटाके दुकान केंद्र व राज्य शासनाच्या नियमावलीनुसार आहेत. काय यासह खबरदारीच्या सर्व उपाययोजना व मनापाकडील आवश्यक परवानगी आहे का या सर्व बाबीची तपासणे करण्यासाठी तहसिलदारांना पाठविण्यात आले आहे. त्यांच्याकडील तपासणी अहवाल काय येतो हे पाहुनच फटाके दुकानांना परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय होईल असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले.परंतु दोन दिवस झाले असून ही तहसीलदार अहवाल कधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण..?
फटाके विक्रीच्या ठिकाणी कसलीही उपाययोजना नसताना खुलेआम फटाके विक्री होत आहे.या काळात जर एखादी मोठी घटना किंवा जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण असा सवाल पत्रकार संरक्षण समितीने केला आहे.