Home मराठवाडा मांजरा नदी पात्रात बांधलेल्या डंपिंग हाऊस व नदी पात्रात टाकत असलेल्या घणकचऱ्याची...

मांजरा नदी पात्रात बांधलेल्या डंपिंग हाऊस व नदी पात्रात टाकत असलेल्या घणकचऱ्याची चौकशी करा – महेंद्र गायकवाड

206

नांदेड – बिलोली तालुक्यातील मांजरा नदी महाराष्ट्र व तेलंगणा या दोन्ही राज्याच्या सीमेवर असून महाराष्ट्राच्या हद्दीत असलेल्या मांजरा नदी पात्रात तेलंगणातील घनकचऱ्याचेअनधिकृत डंपिंग हाऊस बांधले आहे. परंतु त्याचाही वापर न करता तेलंगणातील घनकचरा थेट नदी पात्रात टाकला जात आहे.

त्यामुळे नदी प्रदूषित होत आहे तेलंगणाची घुसखोरी बंद करून हे डंपिंग हाऊस काढून टाकावे व याप्रकरणाची सविस्तर चौकशी करून प्रतिबंधित करावे अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड जिल्हाधिकारी नांदेड व प्रदूषण उप प्रादेशिक कार्यालय नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तेलंगणाने सीमावादात नेहमीच महाराष्ट्रावर कुरघोडी केली आहे.
मग तो बाभळी बंधारा असो की सालूरा व खंडगाव जॅकवेल असो तेलंगणाने आपला वर्चस्व दाखवीले असतांना मात्र महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी असो की शासकीय अधिकारी यांनी मात्र गांभीर्याने याची दखल घेतली नाही. बिलोलीच्या उप विभागीय अधिकारी व तहसील विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
त्यामुळे तेलंगणा प्रशासनाकडून महाराष्ट्राच्या हद्दीत असलेल्या नदीपात्रात चक्क घनकचरा साठवण्यासाठी डंपिंग हाऊस शेड उभारले आहे. परंतु याकडे बिलोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालयामधील एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतले नाही. मांजरा नदीच्या जुन्या पुला लगत उघड्यावर कचरा टाकून नदीपात्र दूषित केले जात आहे व महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये येऊन अनाधिकृत डंपिंग हाऊस तेलंगणाने बांधले आहे. एवढा गंभीर प्रकार होत असतांना ही बिलोलीचे उपजिल्हाधिकारी व तहसीलदार मात्र “गांधारी”ची भूमिका घेत आहेत याचे नेमके कारण काय? जिल्हा प्रशासनाने त्वरीत तेलंगाणा सरकारला प्रतिबंधित करुन हे अनाधिकृत डंपिंग हाऊस काढून टाकावे व या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड,जिल्हासचिव शशिकांत गाढे पाटील,दक्षिण विभाग प्रमुख प्रशांत बारादे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व प्रदूषण उप प्रादेशिक कार्यालय नांदेड यांच्याकडे केली आहे.