Home विदर्भ कोरोनाच्या सौम्य लक्षणाच्या रुग्णांसाठी उपचाराचे दर निश्चित – जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश

कोरोनाच्या सौम्य लक्षणाच्या रुग्णांसाठी उपचाराचे दर निश्चित – जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश

176

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा, दि , 25 :- कोरोनाची तीव्र स्वरुपाची लक्षणे नसणाऱ्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत येणा-या पॅकेजेस मध्ये लाभ घेता येत नाही. अशा रुग्णांकडून उपचारासाठी घेण्यात येणाऱ्या फी बाबत जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी दर निश्चित केले आहेत. बेड चार्ज ,जेवण औषधी यासाठी प्रती दिवस जास्तीत-जास्त ७०० रुपये या दराने शुल्क आकारण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
राज्य शासनाने कोविड-१९ साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरीकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत 31 जुलै पर्यंत उपलब्ध करुन देण्याबाबत 23 मे रोजी शासन निर्णय जारी केला आहे. महाराष्ट्रमधील सर्व उत्पन्न गटातील नागरीकांसाठी वीस पॅकेजेस अंतर्गत या योजनेत लाभ देण्यात येतो. सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता उत्पन्नाची कोणतीही अट नाही. केवळ सदर व्यक्ती ही महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात कोविड-१९ चा संसर्ग झालेले कोरोना रुग्ण कस्तुरबा गांधी हॉस्पीटल, सेवाग्राम व आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय, सावंगी (मेघे) येथे भरती करण्यात येतात. कोविड-१९ रुग्णांच्या उपचारासाठी ही दोन्ही रुग्णालये ही योजना राबविण्यास पात्र आहे.
तथापी, बरेचशे रुग्ण ज्यांना कोरोनाची तीव्र स्वरुपाची लक्षणे नसतात किंवा सौम्य लक्षणे असतात ते महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत येणा-या पॅकेजेस मध्ये लाभ घेण्यास पात्र ठरत नाही. यामुळे अशा रुग्णांकडून किती
उपचार शुल्क/फी आकारावी याबाबत नियम करणे आवश्यक होते. याचा विचार करून जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी कोविड-१९ चे बाधीत रुग्ण महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत येणा-या पॅकेजेस मध्ये लाभास पात्र नाही, अशा रुग्णांकरीता रुग्णालयांनी प्रती दिवस जास्तीत-जास्त ७०० रुपये या दराने शुल्क आकारण्या बाबत आदेश केले आहेत. यामध्ये बेड चार्ज, जेवण, औषधी व इतर उपचार यांचा समावेश राहील. कोविड तपासणी करीता ज्या किट प्रशासनामार्फत मोफत पुरविल्या जातील अशा कीटचा उपयोग ICMR च्या निकषानुसार करावायाच्या चाचण्यांकरीता करण्यात यावा, यासाठी रुग्णांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये.
तसेच अल्प उत्पन्न गटातून येणाऱ्या रुग्णांसाठी आणि धर्मदाय आयुक्त यांनी आदेशीत केल्यानुसार 10 टक्के बेड हे अत्यल्प उत्पन्न गटातील रुग्णांकरिता राखीव ठेऊन त्यांना नि:शुल्क बेड उपलब्ध करुन द्यावेत.
केवळ सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्याबाबतचा निर्णय त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर घेतील व ज्यांना दहा दिवसाच्या आधी सुट्टी दिली असेल त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी ठवण्यात यावे. तिथे कोणतेही शुल्क लागणार नाही असेही आदेशात नमूद केले आहे.