Home यवतमाळ विदर्भ साहित्य संघ यवतमाळ शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर

विदर्भ साहित्य संघ यवतमाळ शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर

50
अध्यक्षपदी प्रा. डॉ. सतपाल सोवळे तर सदस्यपदी डॉ. ललिता घोडे, प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे, नितीन पखाले, विद्या खडसे, विनोद भगत, धनंजय पांडे, प्रा. अतुल सारडे, मोरेश्वर पुंडशास्त्री यांची निवड
यवतमाळ : विदर्भ साहित्य संघाच्या यवतमाळ शाखेच्या अध्यक्ष व कार्यकारिणी पदासाठी झालेल्या सर्वसाधारण सभेत डॉ. सतपाल सोवळे यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी कार्यकारिणतील आठ सदस्यांचीही निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अनिरूद्ध पांडे होते तर विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रिय कार्यकारिणीचे सदस्य प्रा. डॉ. देवेंद्र पुनसे, विवेक कवठेकर यांच्यासह यवतमाळ शाखेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. रमाकांत कोलते, सदस्य प्रा. अशोक मेनकुदळे, प्रा. दिनकर वानखडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

स्थानिक लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयात शुक्रवारी सायंकाळी ही सभा पार पडली. यवतमाळ शाखेचे सचिव प्रा. डॉ. विवेक विश्वरूपे यांनी सभेचे प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. घनश्याम दरणे यांनी सभेच्या अध्यक्षस्थानी अनिरूद्ध पांडे यांची निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यास धनंजय पांडे यांनी अनुमोदन दिले. सभेची सुरुवात झाल्यानंतर मुख्य विषयपत्रिकेनुसार नवीन कार्यकारिणीच्या निवडीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. यामध्ये उपस्थित सर्व आजीवन सभासदांच्या साक्षीने व आवाजी मतदानाने ही निवड प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अध्यक्षपदी प्रा. डॉ. सतपाल सोवळे यांचे नाव प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे सूचविले तर प्रा. गजानन लोहवे यांनी त्याला अनुमोदन दिले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या निवडीचे स्वागत केले.

अध्यक्षपदाव्यतिरिक्त संस्थेच्या सुयोग्य संचलनासाठी आठ सदस्यांची कार्यकारिणीही यावेळी आवाजी मतदानाने, सर्वानुमते निवडण्यात आली. त्यात डॉ. ललिता घोडे, प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे, नितीन पखाले, विद्या खडसे, विनोद भगत, धनंजय पांडे, प्रा. अतुल सारडे, मोरेश्वर पुंडशास्त्री यांचा समावेश आहे. सर्वसमावेशक कार्यकारिणी निवडल्याबद्दल उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. या निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा. डॉ. सतपाल सोवळे यांनी मनोगत व्यक्त करून जिल्ह्यातील साहित्यिक चळवळीला व उपक्रमांना अधिक गती देण्याचा मानस व्यक्त केला. सभेस विदर्भ साहित्य संघाचे आजीवन सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो कॅप्शन – सभाध्यक्ष व केंद्रिय कार्यकारिणी सदस्य (बसलेले) यांच्यासह विदर्भ साहित्य संघ नवनियुक्त कार्यकारिणी सदस्य (उभे)