Home मराठवाडा नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नाही , प्रादुर्भाव वाढू नये यासाठी...

नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नाही , प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वांचे प्रयत्न महत्वाचे , आवश्यक नसेल तेंव्हा घराबाहेर पडू नका – पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन

76
0

नांदेड , दि.६ ( राजेश भांगे ) :- जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वांचे प्रयत्न महत्वाचे आहेत. नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करतांना गर्दी न करता आवश्यक नसेल तेंव्हा घराबाहेर पडू नका, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

जिल्ह्यात कोरोना संदर्भात सुरु असलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी यांच्या बैठक कक्षात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, शेतकरी व विविध योजनेतील गरजू नागरिकांना नियमित मदत करणे आवश्यक आहे. त्यांना मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम वेळेवर देण्यासाठी बँकांनी आवश्यक असेल त्या उपाययोजना कराव्यात. गाव व शाखानिहाय अनुदानाची रक्कम वाटप करतांना टोकन नंबर, दिनांक ठरवून एसएमएसद्वारे लाभार्थ्यांना माहिती दयावी. त्याअनुषंगाने आवश्यक ते सहकार्य घेऊन बँकेतील गर्दी टाळण्यासाठी दक्षता घ्यावी. खरेदी केंद्राद्वारे शेतकऱ्यांचा माल तूर व चना खरेदी करतांना कोणतेही अडवणूक होणार नाही यासाठी लॉकडाउन काळात अत्यावश्यक उपाययोजना करुन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील असे प्रयत्न करावीत. जिल्ह्यातील दुध संकलनाची क्षमता वाढविण्यासाठी दुध केंद्रासाठी लागणारी आवश्यक उपकरणे व मनुष्यबाळाचा आढावा घेऊन जिल्ह्यात दूध संकलनात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी केली.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सुचनेनुसार शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानांतून एप्रिल, मे आणि जून महिन्याचे धान्य वाटप करतांना कोणत्याही तांत्रिक अडचणीमुळे पात्र शिधापत्रिकाधारक, गरजू नागरिक वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. शिधापत्रिका धारकांना येत्या जुलै ते डिसेंबर या काळात दिल्या जाणाऱ्या नियमित धान्य वाटपाच्या नियोजनाची माहिती त्यांनी घेतली. कोविड १९ विषाणू प्रसारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्यात आमदार निधीतून दिला जाणारा निधी खर्च करतांना ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी एक व्हेंटीलेटरची खरेदी करणे आवश्यक आहे. त्याबाबत मतदारसंघातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन आरोग्याच्यादृष्टिने अनुषंगीक बाबींवर लागणारी प्राधान्यक्रमाने सामुग्रीची माहिती त्वरीत करावी. त्यानुसार प्राधान्यानेच आवश्यक बाबी खरेदी करणे योग्य राहील, असेही त्यांनी नमूद केले.

महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून रुग्णांना विविध आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन ग्रामीण भागातील रुग्णांना डायलिसिसची सुविधा स्थानिक स्तरावर देण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची माहिती घेऊन आरोग्याच्यादृष्टिने आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील.

लॉकडाऊन काळात सर्व प्रार्थना स्थळे बंद असून इंडोनिशियातून भारतात आलेले दहा नागरिकांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्यांची तपासणी करण्यात आली असून त्यांचा तपासणी रिपोर्ट येणार आहे, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयातील दोनशे खाटाच्या बाह्यरुग्ण विभागात सोयी-सुविधा पुरविण्यासह जिल्ह्यातील विविध विषयाच्या अनुषंगाने आढावा घेऊन जिल्हा प्रशासन व संबंधित विभागांना उपयुक्त सुचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी दिल्या.