Home महत्वाची बातमी होय बसली असेल एखाद्या निष्पाप व्यक्तीला लाठी.

होय बसली असेल एखाद्या निष्पाप व्यक्तीला लाठी.

132
0

पण शेकडोंच गर्दी पांगली
लाखोंनी होणारे संसर्ग वाचले
कर्तव्य तत्पर अधिकाऱ्याची व्यथा.

सध्या देशभरात संचार बंदी सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. त्यात सध्या पोलीसांनी केलेल्या लाठीहल्ला चर्चा सर्वत्र रंगत आहे. काही ठिकाणी लोकांनी पोलीसांवर प्रतिहल्ला केला. पोलीसांनी लाठीहल्ला केल्याचे योग्य असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले असले तरी पोलीसांवरील नाराजी लपविता येत नाही. याबाबतीत आलेला अनुभव एका अधिकाऱ्याने व्यक्त केलाय.

सुरुवातीला बाहेर निघू नका, सहकार्य करा. परिस्थिती गंभीर आहे या सूचना देत फिरलो. तरीही गल्लीगल्लीत, चौकाचौकात घोळके करून बसलेली तरुणाई पोलीसांची खिल्ली उडवताना दिसत होती. ही गर्दी आणि इटलीची सध्याची परिस्थिती याचा विचार केल्यावर मात्र अंगावर काटा उभा राहत असे. पोलीस गाडी आल्यावरही गर्दी पांगत नसे. गाडीकडे सर्कस यावी तसे पाहत होते. समजावून सांगायला गेले तर ” आहो जातो ना, इथेच घर आहे, जातो लगेच ही ठरलेली उत्तरे असत आणि गाडी पुढे गेली की तिथेच बसायचे. समजत नव्हते त्यांना कोरोना आजाराचे गांभीर्य कसे समजावून सांगावे. सांगूनही ऐकत नसल्याने नुसता वैताग आला होता. त्यात दिवसरात्र पूर्ण परिसरात फिरणे, लोकांशी बोलणे यात आम्हांला प्रादुर्भाव होण्याची भिती ती वेगळीच. त्यानंतर एके दिवशी गाडी चौकात थांबवली. एक दोन जणांना पायावर काठीने फटकारले. एका क्षणात गर्दी गायब. नंतर चौकात जमायची फारशी कोणी हिम्मत केली नाही. दुचाकी आणि चारचाकी यांना पण मार देऊ या अविर्भावात समोर गेलो. संपूर्ण परिसरात बातमी फिरली. पोलीस पाहताक्षणी झोडपताहेत. परिसर निर्मनुष्य झाला. बिनकामी फिरणारे, तावळखोर तरुण गायब झाले.

प्रशासनाला जे हवे आहे ते साध्य होताना दिसू लागले. मग आमचा मार्ग योग्य की अयोग्य याचा विचार नव्हता. कारण संकट हे फक्त लोकशाही, एखादी सत्ता किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य उलथवून टाकणारे नव्हते, तर अवघी मानव जात धोक्यात आणणारे आहे. बंदोबस्त आटोपून मग विचार आला, बसली असेल एखाद्या निष्पाप व्यक्तीला लाठी, पण शेकडोंची गर्दी पांगली, लाखोंनी होणारे संसर्ग वाचले.

कृपा करून पोलीसांना सहकार्य करा.

अभिजीत विश्वम्बर मुळे
सोलापूर ग्रामीण
व्हाट्सअप – 9822907870