Home महत्वाची बातमी शिक्षेतून वाचण्यासाठी मित्राचा खून करून स्वतःच्याच खुनाचा केला बनाव

शिक्षेतून वाचण्यासाठी मित्राचा खून करून स्वतःच्याच खुनाचा केला बनाव

98
0

शिक्षेतून वाचण्यासाठी मित्राचा खून करून स्वतःच्याच खुनाचा केला बनाव

बीड/युनूस अन्सारी

दरोड्याच्या गुन्ह्यात न्यायालयाकडून शिक्षा होण्याची शक्यता असल्याने चोरट्याने चक्क मित्राचा खून केला. चेहरा विद्रुप करून मृतदेहाला स्वतःचे कपडे, चप्पल घालून व स्वतःचे आधार कार्ड त्याच्या खिशात ठेऊन स्वतःच्याच खुनाचा बनाव केल्याची घटना तपासात समोर आली. मृत म्हणून ज्याची नोंद झाली होती, तोच या खुनाचा मास्टरमाइंड निघाला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणून हैदराबादेतून आरोपीला अटक केली. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी ही माहिती दिली.
अंबाजोगाई शहरातील बुट्टेनाथ दरी परिसरात १७ मार्च रोजी एक मृतदेह आढळला होता. मृतदेहाच्या खिशात रसूल सत्तार कुरेशी या नावाचे आधार कार्ड सापडले होते. रसूलच्या कुटुंबीयांना बोलावून घेतल्यानंतर त्याच्या पत्नीने व कुटुंबीयांनी मृतदेह रसूलाचाच असल्याचे ओळखले होते. अंबाजोगाई शहर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. सुरुवातीला रसूल कुठे फिरला, कुणाला भेटला, त्याचे कुणाशी वैर होते का? या मुद्यावर तपास सुरू केला. या दरम्यान अंबाजोगाईतीलच अलीम इस्माईल शेख (रा. बारभाई गल्ली) हा व्यक्तीही बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे अलिमने रसूलचा खून केला हे गृहीत धरून तपास केला गेला मात्र, पोलिस चौकशीत अनेक संशयास्पद बाबी पोलिसांना आढळल्या रसूलच्या खूनानंतरही पत्नी फारशी दुःखी दिसली नाही. मात्र मृतदेह रसूलचाच असल्याचा दावा वारंवार तिने केला, तर दुसरीकडे अलिमच्या बहिणीला मृतदेह दाखवला असता अलिमचे पाय वाकडे असल्याचे तिने सांगितले व हा मृतदेह अलीमचा असल्याची शक्यता सांगितली. पाय वाकडे असणे ही अनुवांशिकता असल्याचे सांगत तिने स्वतःचे पाय पोलिसांना दाखवले त्यांची रचना अलीमच्या पायांशी मिळती जुळती होती. यानंतर रसूलने अलीमचा खून केल्याचा व स्वतःचाच खून झाल्याचा बनाव केल्याची शंका पोलिसांना आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनात पथकाने तपास केला आणि रसूलनेच अलीमचा खून केल्याचा निष्कर्ष काढून त्याला बुधवारी रात्री हैदराबादहून अटक केली.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही झाला होता कैद
खुनाच्या चौकशीत रसूल एका कसायाच्या दुकानातून काही सामान घेऊन जाताना सीसीटीव्हीत कैद झाला होता. तपासात पोलिसांनी रसूलच्या छातीवरील केसांपासून ते अंतर्वस्त्रापर्यंत चौकशी केली, यातही तफावत आढळली होती. मृतदेहाच्या अंगावरचे अंतर्वस्त्राचा दुसरा जोड अलीमच्या घरी सापडल्याने मृतदेह रसूलचा नसल्याची खात्री पटली होती.
दरोड्याच्या गुन्ह्यात होणार होती शिक्षा
रसूलच्या चौकशीत त्याच्यावर सन २०१६ मध्ये एक दरोड्याचा गुन्हा नोंद आहे. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणीत शिक्षा होण्याची शक्यता रसूलला होती. यासाठी त्याने या प्रकरणातील तक्रारदारावर दबाव आणून, पैशाचे आमिष दाखवून निर्दोष सुटण्याचेही प्रयत्न केले, पण तक्रारदार ठाम राहिला म्हणून अलीमने स्वतःच्याच खुनाचा बनाव करून हैदराबाद गाठले.
सीआयडी मालिका पाहून प्लॅन
टीव्हीवर सीआयडी ही मालिका पाहून त्याने खुनाचा प्लॅन केला. रसूल हैदराबादहून आल्यानंतर अलीम हा त्याच्या संपर्कात असायचा, दोघे सोबत जेवण करत व दारू पित. १७ मार्च रोजी रसूलने अलीमला दारू पाजली व त्याचा खून केला. चेहरा विद्रुप करून स्वतःचे कपडे त्याला घातले, स्वत:चे आधार कार्ड त्याच्या खिशात ठेवून पळ काढला.
या पोलिसांच्या पथकाने केला तपास
एसपी हर्ष पोद्दार, एएसपी विजय कबाडे, स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनात एलसीबी पीआय भारत राऊत, पीएसआय गोविंद एकीलवाले, कर्मचारी भास्कर केंद्रे, बालाजी दराडे, तुळशीराम जगताप, नसीर शेख, विकास वाघमारे, संगीता शिरसाट, संजय जायभाये, अतुल हराळे, आसेफ शेख, मुकुंद तांदळे यांनी व अंबाजोगाई शहर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हैदराबादेतून ताब्यात घेतलेला आरोपी पोलिसांसमवेत. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली.

Previous articleआलेगाव ग्रामपंचयतीचे वतीने करोना वायरस विषयी नागरिका मध्ये जन जागृति…!
Next articleकोरोना पार्श्‍वभूमीवर राज्यातील पत्रकार बांधवासांठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावे.
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here