Home महत्वाची बातमी नवरा – बायकोच्या भांडणाला नेले ‘कोरोना’कडे…कर्जतमध्ये पत्रकारावर गुन्हा दाखल…!

नवरा – बायकोच्या भांडणाला नेले ‘कोरोना’कडे…कर्जतमध्ये पत्रकारावर गुन्हा दाखल…!

152

कर्जत – तालुक्यातील कळंब येथील गरुडपाडा गावात नवरा-बायकोच्या भांडणाला चुकीच्या माहितीच्या आधारे ‘कोरोना’कडे ओढले गेले आणि चांगलाच गोंधळ उडाला. या सगळ्या भानगडीत जमावबंदी आदेशाचा भंग केल्याने नेरळ पोलीस ठाण्यात एका पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना अध्यादेश आणि संचारबंदीनुसार ही कारवाई करण्यात आली असून कोरोनाबाबत चुकीची माहिती समाजमाध्यमात देणार्‍यावर प्रशासनाकडून कारवाई केली जात असल्याचे या प्रकरणावरुन दिसून आले आहे.
कळंबजवळील गरुडपाडा येथे असलेल्या भागा गोविंद बदे आणि सुरेखा भागा बदे यांची मुलगी अपर्णा हिचे लग्न झाले असून, ती जुन्नर येथे राहते. मात्र आपल्या नातेवाईकाचे निधन झाले म्हणून ती माहेरी कळंब येथे आली होती. दीड महिना झाला तरी पत्नी घरी येत नाही, म्हणून अपर्णाचे पती सुनील हरिभाऊ वरपे हे जुन्नर येथून 25 मार्च रोजी सकाळी कळंब येथे पोहचले. तेथे आल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला जुन्नरला निघण्याबाबत सांगितले. परंतु, अपर्णाने यास नकार दिला.
त्यामुळे सुनील वरपे याने सासू, सासरे आणि पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्या तिघांनी सुनील वरपे याला दोरीने बांधून ठेवले. याबाबतची माहिती नेरळ येथे राहणारे खासगी वाहिनीचे पत्रकार यांना मिळाली. दुपारी बारा वाजता ते कळंब गावात पोहचले आणि त्यांनी तेथील स्थानिक मित्राला घेऊन गरुडपाडा गाव गाठले. तेथे भागा बदे यांच्या अंगणात एका व्यक्तीला बांधून ठेवले असल्याचे चित्रण केले आणि आपल्या खासगी वाहिनीवर दुपारी सव्वा दोन वाजता बातमी ब्रेक केली. त्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णाला दोरखंडाने बांधून ठेवले असल्याचा उल्लेख होता. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील, पोलीस उपनिरीक्षक जी के भालचिम, सचिन सांगळे हे गरुडपाडा गावात पोहचले. तेथे पत्नीला घेण्यास आलेल्या जावयाला बांधून ठेवले असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. त्यावेळी पोलिसांबरोबर कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक होते. त्या पथकाने त्या दोरीने बांधून ठेवलेल्या सुनील वरपे तसेच भागा बदे, सुरेखा बदे आणि अपर्णा वरपे यांची तपासणी करुन घेतली असता कोणालाही कोरोनासदृश्य अशी लक्षणे आढळली नाहीत. परंतु खासगी वाहिनीवरील बातमीने सर्वत्र खळबळ माजली होती.
पोलिसांनी या घटनेची आणि बातमीची खातरजमा केली. बातमी चुकीच्या माहितीच्या आधारावर तयार करुन, समाजात भीतीचे वातावरण पसरवल्याबद्दल रात्री नेरळ पोलीस ठाण्यात प्रशासनाच्यावतीने सदर पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात रायगड जिल्हाधिकारी यांचा जमाव बंदीचा आदेश आणि राज्य सरकारच्या गृह विभागाकडून कोरोना प्रतिबंधक उपाययोजना अध्यदेशनुसार लागू असलेली संचारबंदी यांचा भंग केल्याबद्दल भादंवि कलम 188 अन्यये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्याच्या संचारबंदी काळात पत्रकारावर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कोणत्याही बाबीची खात्री करावी, अशी सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना घराबाहेर पडणे आणि चुकीची माहिती प्रसारित केल्याने हे कारवाई करण्यात आली आहे. यापुढे अधिक कठोरपणे प्रशासन संचारबंदी काळात कारवाई करणार आहे. कोणत्याही बाबतीत सर्वांनी खात्री करून घ्यावी आणि नंतर समाजमाध्यमे यांच्याकडे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात.
अविनाश पाटील,
सहायक पोलीस निरीक्षक,
नेरळ पोलीस ठाणे