Home मराठवाडा सार्वजनिक शांतता भंग चा गुन्हा दाखल! सिंदखेड पोलिसांची कारवाई….

सार्वजनिक शांतता भंग चा गुन्हा दाखल! सिंदखेड पोलिसांची कारवाई….

101

मजहर शेख

नांदेड / माहूर , दि. २६ :- माहुर तालुक्यातील वाई बाजार येथील आठवडी बाजार भरविण्याच्या कारणावरून उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य मध्ये चांगलीच हमरीतुमरी झाली. या वादाचे पर्यावसन झटापटीत होऊन कलम १४४ लागू असताना सार्वजनिक शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली दोघांवर सिंदखेड पोलिसात दि.२४ मार्च रोजी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

वाई बाजार येथील ग्रामपंचायत या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहते.दि.१७ मार्च रोजी जिल्हा प्रशासनाचे आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश असताना दस्तुरखुद्द उपसरपंच यांनीच सकाळच्या सत्रात आठवडी बाजारात फिरून व्यापाऱ्यांना दुकाने लावण्यासाठी प्रवृत्त केले होते. दुपारच्या सुमारास पोलीस येऊन धडकल्यानंतर उपसरपंचांनी घुमजाव करत पोलिसांसोबत फिरून परत दुकाने बंद केली.काल दि.२४ मार्च रोजी मंगळवार ला आठवडी बाजार भरतो का ? हे पाहण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य उदय जोगा जाधव राहणार वाई तांडा चौकात आले असता उपसरपंच हाजी उस्मान खान चांद खान यांच्यासोबत त्यांची शाब्दिक चकमक झाली. थोड्या वेळातच हमरीतुमरी होऊन ग्रामपंचायतच्या लोकप्रतिनिधींमध्ये झटापट सुरू झाली. प्रचंड लोकांची गर्दी ही भानगड बघण्यासाठी जमली होती.राज्यात सध्या १४४ कलम लागू असताना सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्या व कायदा आणि सुव्यवस्थेचा आव्हान देणाऱ्या उपसरपंच हाजी उस्मान खान चांद खान व ग्रामपंचायत सदस्य उदय जोगा जाधव यांच्याविरुद्ध पोलीस हेडकॉन्स्टेबल हेमंत रामराव मडावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय चव्हाण हे करीत आहे.