Home महाराष्ट्र Coronavirus: मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्राच्या जनतेला हाक , “भोंगा वाजला आहे, करोनाविरुद्ध युद्ध सुरु...

Coronavirus: मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्राच्या जनतेला हाक , “भोंगा वाजला आहे, करोनाविरुद्ध युद्ध सुरु झालंय”

101
0

राजेश भांगे

करोनाचे संकट हे व्हायरसविरुद्धचे युद्ध आहे. तुम्ही सहकार्य करावे ही माझी अपेक्षा आहे. तुम्ही घर सोडू नका. बाहेर जाऊ नका, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं आहे. करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकार काय काळजी घेत आहे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळेस बोलताना त्यांनी हे एक प्रकारचे युद्ध असून तुम्ही सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे असं म्हटलं आहे.
राज्यामधील करोनाग्रस्तांची संख्या ४५ हून अधिक झाली आहे. यामुळे राज्य सरकारने मागील काही दिवसांमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. मात्र रुग्णांची संख्या वाढत असल्याचे जनतेमध्ये भितीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळेस बोलताना उद्धव यांनी महाराष्ट्रातील जनतेला घाबरुन जाण्याचं कारण नसल्याचं सांगितलं आहे. “कोरोनासाठी आपली यंत्रणा सज्ज आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या साठा देखील आहे. घाबरून जाऊ नका,” असं उद्धव यांनी जनतेला सांगितलं आहे.
जनतेला संबोधित करताना त्यांनी १९७१ च्या युद्धांची आठवण करुन दिली. “हा युद्धासारखा प्रसंग आहे. मला आठवतयं १९७१ च्या युद्धाच्या काळामध्ये भोंगे वाजले की घरातील प्रकाश बाहेर जाऊ नये म्हणून खिडक्यांवर जाड कागद लावले जायचे. सध्या असलेली परिस्थिती हे सुद्धा व्हायरसविरुद्ध युद्धच आहे. भोंगा वाजला आहे आपण सावध आणि सतर्क राहिलं पाहिजे. सरकार आवश्यक ते सर्व निर्णय घेत आहेत. तुम्ही सहकार्य करावे ही माझी अपेक्षा आहे. तुम्ही घर सोडू नका. बाहेर जाऊ नका. तुमच्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस हे त्यांचं घर सोडून काम करत आहेत. संपूर्ण सरकारी यंत्रण करोनाचा प्रादूर्भाव थांबवण्यासाठी सज्ज झाली आहे. तुम्हीही सहकार्य करा,” असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

Previous articleकरोना व्हायरसमुळे दोन कोटी ५० लाख नोकऱ्यांवर येणार गदा
Next article
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here