Home जळगाव गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करु नये

गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करु नये

238
0

जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांचे आवाहन

रावेर (शरीफ शेख)
जळगाव देशातंर्गत कोरोना विषाणूचे संसर्गबाधीत रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने खबरदारीचे उपाय म्हणून साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये अधिसूचना व नियमावली निर्गमित करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 43 अन्वये मोठ्या प्रमाणात लोकांचा समुह एकत्र जमु न देण्यासाठी संपुर्ण जिल्ह्यामध्ये घेण्यात येणाऱ्या सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रम, क्रिडास्पर्धा अशा प्रकारच्या कार्यक्रमांवर 31 मार्च, 2020 पर्यंत बंदी लागू करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकरी डॉ. अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.

जत्रा, यात्रा, उरुस इत्यादि धार्मिक/सामाजिक कार्यक्रमात पुजारी किंवा धर्मगुरू इत्यादिंना विधीवत पुजा करण्यास किंवा परंपरेने करावयाचे कार्यक्रम मोजक्या लोकांचे उपस्थितीत करण्यास बदी असणार नाही. तसेच खाजगी कार्यक्रम फक्त कौटुंबिक स्वरुपात करण्यास बंदी असणार नाही. परंतु असे कार्यक्रम करतांना सर्व वैद्यकीय सुरक्षा पाळणे बंधनकारक राहील. यासाठी मनपाचे आयुक्त, संबंधित तालुक्याचे तहसिलदार, नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रासाठी मुख्याधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अशा कार्यक्रमासाठी लेखी पुर्व परवानगी घेणे आवश्यक असेल.

शासकीय यंत्रणांनीही अशाप्रकारचे सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिडास्पर्धा अशाप्रकारे आयोजनासंदर्भात कोणतीही परवानगी त्यांच्या स्तरावर परस्पर देवू नये. जिल्ह्यातील मनपाचे आयुक्त, नपाचे मुख्याधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांना त्यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या कार्यक्रमांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच फक्त पुजा किंवा कौटुंबिक कार्यक्रमांना परवानगी देण्यासाठी प्राधिकृत करून तसे अधिकार प्रदान करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.