
शासकीय रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
अमीन शाह
नांदेड , दि. ०६ :- नांदेडमध्ये करोनाचा संशयित रूग्ण सापडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, या रूग्णावर येथील शासकीय रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
जगभरात करोना व्हायरसचा उद्रेक झाला असून, भारतात करोनाचे अनेक रूग्ण सापडले आहेत. दिल्ली पाठोपाठ शेजारील तेलंगणा राज्यामध्ये करोनाचा एक रूग्ण सापडला होता. नांदेड जिल्हा हा तेलंगणा राज्याच्या सीमेवर असून आता नांदेडमध्ये करोनाचा एक संशयित रूग्ण आढळून आला आहे. या वृत्तामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
करोनाचा संशयित रूग्ण सापडल्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या रूग्णावर विष्णुपुरी येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून त्या रूग्णाला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. शासकीय रूग्णालयातील डॉक्टर या रूग्णाच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत. तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आले आहेत. या संशयित रूग्णाच्या तपासणीचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे वृत्त आहे.
जिल्हाधिकार्यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीस गेले आहेत. या रूग्णाची प्रकृती उत्तम असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीळकंठ भोसीकर यांनी दिली आहे.
आताच सांगता येणार नाही –
“त्या रूग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अजूनपर्यंत अहवाल प्राप्त झाला नाही. त्यामुळे करोनाचा रूग्ण आहे किंवा नाही, हे आताच सांगता येणार नाही. डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत. आवश्यक औषधींचा मुबलक साठा रूग्णालयात उपलब्ध आहे. रूग्णालय प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत,” अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिली.











































