Home मराठवाडा राज्यातील विविध भागात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान

राज्यातील विविध भागात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान

149
0

नांदेड , दि .३ ; ( राजेश भांगे ) –
राज्यात अनेक भागांत शनिवारी आणि रविवारी वादळी पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि वऱ्हाडच्या अनेक जिल्ह्यांत वादळी वारे, मेघगर्जना, विजा, गारपिटीसह मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडल्या. रब्बीची पिके, फळबांगाना या पावसाने तडाखा दिला. गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, मका ही रब्बी पिके, भाजीपाला पिकांना फटका बसला असून, संत्रा, द्राक्ष, आंबा, डाळिंब उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सोमवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. ऐन सुगीमध्ये रब्बी पिके, फळपिके, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.वादळी वाऱ्यामुळे ज्वारी, गहू आदी उभी पिके आडवी झाली. काढणी सुरू असलेला हरभरा, गहू आदी पिकांचे भिजून नुकसान झाले. संत्रा फळपिकांच्या फांद्या मोडल्या. आंब्याचा मोहर गळून पडला.कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागांत रविवारी (ता. १) सायंकाळी अवकाळी पावसाने झोडपून काढले. काढणीच्या अवस्थेतील रब्बी पिकांबरोबरच ऊस तोडणीलाही फटका बसला. एक तास पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. आजरा, भादवण, पेरणोली, कोवाडे यासह तालुक्‍यात ठिकठिकाणी पाऊस झाला. उतूरसह वझरे, महागोंड, हालेवाडी, वडकशिवाले, बहिरेवाडी परिसरात पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. पावसामुळे उसाने भरलेली वाहने शेतातच अडकून पडली. शिरोळ, अर्जुनवाड भागात जोरदार पाऊस झाला. या भागातील ऊस तोडणी ठप्प झाली.सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटणसह कऱ्हाड, पाटण तालुक्‍यांत रविवारी (ता. १) अवकाळी पावसाने हजेरी लावली. उभी पिके पडल्याने व भिजल्याने नुकसान झाले आहे. माण तालुक्‍याच्या बिजवडी परिसरातील राजवडी, पाचवड, अनभुलेवाडी, जाधववाडी, तसेच म्हसवड परिसरातील पुळकोटी, बनगरवाडी, जांभुळणी, भाटकी, खडकी, कारखेल आदी गावांच्या परिसरात दुपारी चारच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी काढणीस आलेल्या उभ्या पिकांना मात्र या पावसाचा फटका बसला. पावसाने काही ठिकाणी आंब्याच्या मोहराचे नुकसान झाले. द्राक्ष, हरभरा आदी पिकांनाही फार मोठे नुकसान पोचले.सांगली शहर आणि परिसरात रविवारी (ता. १) सायंकाळी सहाच्या सुमारात अंधारून आले आणि अचानक पावसाला सुरुवात झाली. जत तालुक्याच्या पूर्व भागात पाऊस झाल्याने द्राक्ष बेदाणा हा माल बेदाण्यासाठीच्या शेडवरील पावसाने काळा पडणे व कुजण्याची भीती आहे. द्राक्ष घड गळून पडणे, मण्यांना तडे जाणार आहेत. जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बोरगाव, नवे व जुने खेड परिसर, तसेच बहे, साखराळे भागात हा पाऊस झाला. तासगाव तालुक्यातही पावसाचा शिडकाव झाला. हरभरा मळणीवरही पावसाचा परिणाम झाला.
या जिल्ह्यांना बसला तडाखा
नांदेड, परभणी, हिंगोली, नगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अकोला, वाशीम, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद.

Unlimited Reseller Hosting