Home महत्वाची बातमी खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

89
0

रवि माळवी

यवतमाळ , दि. २९ :- पतीने हुंड्यासाठी पत्नीचा छळ करुन तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळले. ही घटना दिनांक १३.८.२०१८ रोजी देविनगर लोहारा येथे घडली होती. सदर खुनाचा खटला जिल्हा सत्र न्यायालयात सुरु असतांना आज दिनांक २९ फेब्रुवारी रोजी प्रकणाचा निकाल लागून न्यायाधिशांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
विनोद गुलाबराव अरसोड (वय ३६)वर्षे रा.तरनोळी असे खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस स्टेशन अवधुतवाडी हद्दीतील देविनगर लोहारा येथे आरोपी विनोद अरसोड रा. तरनोळी हा आपल्या पत्नीसह राहत होता. त्याचे लग्न ६ वर्षापुर्वी ग्राम येणस ता.नांदगांव खंडेश्वर येथील विनोद कणसे यांची मुलगी सौ.माधुरी (वय २७) वर्षे हीच्याशी झाले होते. आरोपी विनोद अरसोड ला दारुचे व्यसन होते. तो हुंड्यासाठी पत्नीचा नेहमी छळ करीत होता. याबाबत आरोपीस मृतकाचे आई वडील यांनी समजावून सांगीतले. परंतू आरोपीने पत्नीला त्रास देणे सुरुच ठेवले. दिनांक १३.८.२०१८ रोजी आरोपीने त्याची पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. त्यामध्ये पत्नी पुर्णपणे जळून मरण पावली. या प्रकरणी मृतकाचे वडील विनोद अंबादास कणसे रा.येणस ता. नांदगांव खंडेश्वर जि.अमरावती यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी विनोद अरसोड विरुध्द अवधुतवाडी पोलीस स्टेशनला अप.क्र.१०९०/२०१८ क.३०४ ब, ३०६, ४९८ अ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदिप मुपडे, पोलीस स्टेशन अवधुतवाडी यांनी करुन तपासाअंती आरोपी विरुध्द वि.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदरचा खटला वि.श्री.पेटकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यवतमाळ येथे से.के.क्रमांक एस.टी.क्र.६६/१८ प्रमाणे सुनावणी करीता सुरु असतांना वि.श्री.पेटकर साहेब, प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश यवतमाळ यांनी आज दिनांक २९.२.२०२० रोजी सदर खटल्याचा निकाल जाहीर केला. त्यामध्ये ७ साक्षदार तपासण्यात आले. नंतर आरोपीचे मुलाचे साक्षवरुन वि.न्यायालयाने आरोपी विरुध्द भादंवि कलम ३०२ चे समाविष्ट केले. वि.न्यायालयाने आरोपीचे मुलाचे साक्ष व ईतर साक्ष पुरावे ग्राह्य धरुन आरोपीला भादंवि कलम ३०२ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
सदर प्रकरणात सरकार तर्फे ए.जी.पी.दरणे मॅडम यांनी काम पाहिले तर, साहायक फौजदार /१७७८ दिनकर चौधरी पोलीस स्टेशन अवधुतवाडी यांनी कोर्ट पेरवी म्हणून काम पाहिले.