Home महत्वाची बातमी आंदोलनाच्या जागेचा प्रश्न लवकरच निघणार निकाली…!

आंदोलनाच्या जागेचा प्रश्न लवकरच निघणार निकाली…!

192

निखिल सायरेंच्या पाठपुराव्याला प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद…!!

जिल्हा प्रशासनाची हालचाल सुरू….!!!

यवतमाळ जिल्ह्याला चळवळीची मोठी व गौरवशाली परंपरा लाभली आहे. इथल्या चळवळीला, आंदोलनाला थोरामोठ्यांचे आशिर्वाद मिळाले आहेत. कित्येकदा यवतमाळातील आंदोलनांची दखल राज्य पातळीवर घेतली गेली. याच आंदोलनाने अनेकांना मोठेही केले. मात्र आंदोलनांची जागाच हरवल्याने जिल्ह्याचे मुख्यालयच आंदोलनाला पोरके झाले. याबाबत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते निखिल सायरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत आंदोलनाकरीता जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रश्न निकाली काढण्यासाठी हालचाल सुरू केली आहे.

नागरीकांचे विविध प्रश्न लोकशाहीच्या मार्गाने मांडण्याकरीता समस्त नागरीक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, मोर्चा, उपोषण करत असे. मात्र यापूर्वीच्या जिल्हाधिकारी महोदयांनी त्याऐवजी तिरंगा चौकात आंदोलन करण्याकरीता आदेशित केले होते. सद्यस्थितीत सदर जागेवर आता दुकाने सुरू झाल्याने न्याय मिळविण्यासाठी आता आंदोलन करायचे तरी कुठे हा प्रश्न निर्माण झालेला होता. याप्रकरणी पूर्वीप्रमाणेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संवैधानिक आंदोलन करण्याकरीता जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निखिल सायरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे दृष्टीने जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात येत आहे.

कित्येक दशकांपासून जिल्हाधिकारी कार्यालय हे संवैधानिक आंदोलनाने न्याय मिळवण्याचे केंद्र होते. मात्र हि जागाच हरवल्याने जिल्ह्याचे मुख्यालय आंदोलनहीन झाले आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन संवैधानिक आंदोलनाकरीता कोणती जागा निश्चित करते, याकडे जिल्ह्यातील नागरीकांचे लक्ष लागले आहे.

चौकटचा मजकुर
“जिल्ह्याची संवैधानिक आंदोलनाची गौरवशाली ओळख कायम राहावी”: निखिल सायरे

“पूर्वापार यवतमाळ जिल्ह्याचे मुख्यालय अर्थात जिल्हाधिकारी कार्यालय हे संवैधानिक आंदोलनाचे केंद्रबिंदू राहीले होते. या आंदोलनाने आपली गौरवशाली ओळख निर्माण केली होती. आज मात्र आंदोलनाची जागाच हरवल्याने हि ओळख मिळण्याच्या परीस्थितीत आहे. हि ओळख कायम राहावी, या करीता जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. हा प्रश्न लवकरच निकाली निघावा, हि अपेक्षा आहे”, असे प्रतिपादन निखिल सायरे यांनी केले.

चौकटचा मजकूर
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

आंदोलनाला जागा उपलब्ध करून देण्याकरीता जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीतून आंदोलनाचे जागेबाबतचा काही महिन्यांपासून प्रलंबित असलेला तिढा सोडवला जाणार आहे.