Home मराठवाडा सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या आकस्मिक भेटीने कर्मचारी धास्तावले

सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या आकस्मिक भेटीने कर्मचारी धास्तावले

41
0

गटविकास अधिकाऱ्यांसह पाच जणांच्या निलंबनाचा तर पाच जणांच्या वार्षीक वेतनवाढी बंद करण्याचा प्रस्ताव….!!

मजहर शेख

नांदेड / किनवट , दि. २६ :- तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाड्या, पशुवैद्यकीय दवाखाना व ग्रामपंचायत कार्यालये अशा विविध कार्यालयांना सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आकस्मिक भेटी देऊन तपासणी असता अस्वच्छता, कामाचा निकृष्ट दर्जा व कुलूपबंद ग्रामपंचायती पाहून या अनागोंदी कारभाराकडे दुर्लक्ष केल्याने गटविकास अधिकाऱ्यांसह पाच जणांच्या निलंबनाचे प्रस्ताव व पाच जणांच्या दोन वार्षीक वेतनवाढी बंद करण्याचे प्रस्ताव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्याचे आदेश दिल्याने कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगळवारी दि. 25 रोजी सकाळीच आकस्मिकपणे सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी विविध कार्यालयांना भेटीचे नियोजन केलं. पहिल्यांदाच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशपुर (नवे ) येथे भेट दिली असता पहिली ते चौथीची मुलं वर्गखोली झाडत असल्याचं आढळून आलं. तेथील स्वयंपाक गृहातील अस्वच्छता आणि 30 जानेवारीला डिजिटल शाळा म्हणून प्रारंभ झालेल्या शाळेतील संगणक व होम थियटर बाजूला टाकून देण्यात आल्याचे पाहून ते उद्विग्न झाले. मुख्यालयी राहात नसल्यामुळे तेथील शिक्षक डी.एच. वंजारे व श्रीमती पी. डी. जाधव यांच्या दोन वार्षिक वेतनवाढी बंद करण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे सादर करण्याचा त्यांनी आदेश दिला.
मलकापूर खेरडा येथील पशुवैद्यकीय दवाखाना कुलूप बंद होता. प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी चंद्रकांत शेवनकर हे मुख्यालयी राहत नसून सतत गैरहजर असतात असे तेथील पंचांनी सांगितले. तेथील कमालीची अस्वच्छता ही हे केंद्र अनेक दिवसापासून बंद असल्याचे दर्शविते. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्याचा त्यांनी आदेश दिला. येथील अंगणवाडीही बंद होती त्यांनाही नोटीस बजावण्यात आली.
मलकापुर खेरडा येथील ग्रामपंचायत कार्यालय बंद असल्याचे आढळून आले ग्रामसेवक व्ही.बी. पांचाळ हे तीन ते चार दिवसाआड गावांमध्ये येतात. सतत अनाधिकृत गैरहजर असतात, असे गावकऱ्यांनी सांगितले, मुख्यालयी राहात नसल्याने आणि इतरही निकृष्ट दर्जाची कामे त्यांनी गावात केल्याने त्यांच्या दोन वार्षिक वेतनवाढी बंद करण्याचा आणि त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे सादर करण्याचा त्यांनी आदेश दिला. मलकापूर खेरड्यातील आरोग्य उपकेंद्राची हीच अवस्था तेही कुलुप बंद होते. आरोग्यसेवकडी. के.जोंधळे व आरोग्यसेविका श्रीमती एस.के. जांभळे हे परस्पर गैरहजर आढळून आलेत. ते मुख्यालयी राहत नाहीत त्यांच्या दोन वार्षिक वेतनवाढीबंद करण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्याचे त्यांनी सूचविले.
त्यानंतर मारेगाव (वरचे ) येथील ग्रामपंचायतीला भेट दिली असता कार्यालय कुलुप बंद होते.ग्रामसेविका श्रीमती जे.एस. निलगीरवार ह्या अनाधिकृत गैरहजर असल्याचे आढळून आले. मनरेगा अंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीचे काम मजूरामार्फत न करता ब्लास्टिंग करून आणि तेही निकृष्ट दर्जाचे केल्याचे आढळून आल्याने ग्रामस्थांनीही ग्रामसेवकाबद्दल विविध तक्रारी केल्या. याबद्दल त्यांनाही निलंबित करण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे सादर करण्याचे त्यांनी आदेशित केले.
ग्रामपंचायत राजगड येथे भेट देऊन गावातील कामांची पाहणी केली मनरेगा अंतर्गत विविध कामे पाहिले असता ती निकृष्ट दर्जाची झाल्याचे आढळून आले. ग्रामपंचायत कार्यालय उघडे होते. ग्रामसेविका श्रीमती एम.एस. गायके उपस्थित होत्या. परंतु तपासणीसाठी एकही अभिलेख उपलब्ध नव्हते. त्यांना विविध नमुने विचारले असता, कोणतेही रजिस्टर येथे उपलब्ध नाही ते मी माझ्या घरी ठेवले आहे आणि मी घरूनच ग्रामपंचायतीचा कारभार चालवते असे त्या ग्रामसेविकेने स्वतः सांगितले. पेसा अंतर्गत झालेली कामे पाहिले असता ती अत्यंत सुमार दर्जाची आढळून आली. ग्रामसेवकांचे कुठलेही नियंत्रण नसून पेसा आणि ठक्करबाप्पा योजनेत सुरू केलेली कामे निकृष्ट दर्जाची आढळून आली आणि पंचांनी देखील सांगितले. तेव्हा त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्याचा आदेश त्यांनी दिला.
जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा मारेगाव ( वरचे ) व जि.प. प्रा.शा. राजगड येथील आकर्षक शैक्षणिक वातावरणाचे त्यांनी कौतुक केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र राजगड येथे भेट दिली असता चार वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी केवळ एक वैद्यकीय अधिकारी हजर होते ; तर तीन गैरहजर होते. त्याचबरोबर औषध निर्माण अधिकारी आणि कनिष्ठ सहायक हेही गैरहजर आढळले. तेथील बायोमेट्रिक मशीन बंद होती. त्यामुळे या केंद्राचा कारभार अत्यंत गलिच्छ स्वरुपाचा असल्याचं दिसून आलं. आरोग्य केंद्रात अस्वच्छता होती. पिण्याचे पाणीही उपलब्ध नव्हते. विद्युत पुरवठा उपलब्ध नव्हता. औषधांच्या नोंदी स्टॉक रजिस्टरला घेतल्या नव्हत्या. मुख्यालयी कोणी राहात नाही असे निदर्शनास आले. एक वैद्यकीय अधिकारी उपस्थित होत्या. त्यांचा ही अनागोंदी कारभार दिसून आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. भाग्यश्री वाघमारे, डॉ. व्ही.आर. आईटवार व डॉ. सचिन जामकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रस्तावित केला आहे. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी डॉ. मीना लटपटे यांच्या दोन वार्षिक वेतनवाढी बंद करण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे आदेश दिले.

त्याचबरोबर औषध निर्माण अधिकारी बि.डी. सादुलवार यांची पेन्शन कार्यवाही थांबविण्यात यावी तसेच कनिष्ठ सहाय्यक सी.के. कंधारे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्याचा आदेश दिला.
भेटी दिलेल्या विविध कार्यालयाचे प्रमुख कार्यालय असलेल्या पंचायत समिती किनवट येथेही सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोखल यांनी भेट दिली आणि गटविकास अधिकारी एस. एन. धनवे यांच्या कानावर या बाबी त्यांनी टाकल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, पशुवैद्यकीय दवाखाना, अंगणवाड्या, शाळा यांना प्रत्यक्ष भेट दिली असता आपलं या कामाकडे कमालीचं दुर्लक्ष असून अनागोंदी कारभार वाढलेला आहे. विविध योजनांच्या कामांची चौकशी झाली पाहिजे आणि गटविकास अधिकारी यांचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. गटविकास अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे मुख्यालयी कोणीही राहत नसून मनानुसार ये -जा करीत आहेत. म्हणून त्यांच्याही दोन वार्षिक वेतनवाढीबंद कराव्यात आणि त्यांचा निलंबनाचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेमार्फत विभागीय आयुक्त यांना पाठवण्याचा त्यांनी आदेश दिला. या सगळ्या भेटीनंतर आणि त्यांनी केलेल्या कारवाईच्या बडग्यानंतर सर्वच अधिकारी कर्मचारी धास्तावले असून सहायक जिल्हाधिकाऱ्यांचं हे नवं रूप पाहून अपडाऊन करणाऱ्या कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

Unlimited Reseller Hosting