Home विदर्भ एकदिवशीय धरणे आंदोलनात बहुसंख्येने सहभागी व्हावे – सौ.वैशाली काळे

एकदिवशीय धरणे आंदोलनात बहुसंख्येने सहभागी व्हावे – सौ.वैशाली काळे

310

वाशिम / कारंजा , दि. २४ :- जनादेशाचा अनादर करून अस्तित्वात आलेल्या अभद्र सरकारच्या कार्यकालातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, नव्या कर्जमाफी योजनेतील फोलपणा, सरकारचे प्रत्येक पातळीवर ठळकपणे दिसणारे अपयश, महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना, जिल्ह्यात उडालेला कायद्याचा बोजवारा, याविरोधात भारतीय जनता पार्टी कारंजाच्यावतीने आज २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांच्या मार्गदर्शनात आयोजित या आंदोलनात शेतकऱ्यांसह भाजपा पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी तथा परिसरातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा गटनेत्या तथा पंचायत समिती सदस्या सौ.वैशाली विजय काळे यांनी केले आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी व कागदावरील असून तळागाळातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार नाही हे स्पष्ट दिसत असतानाही ती रेटली जात आहे. सुरुवातीला सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देणारे आता फसवी कर्जमाफी शेतक-यांच्या माथी मारत आहेत. सरकार स्थापनेपुर्वी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. पण महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फक्त अल्प मुदतीची पीक कर्जे माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. दोन लाखांवर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत महाविकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेत कसलाच उल्लेख नाही. याशिवाय खरिप हंगाम सन २०१९-२० सोयाबीन तसेच कपाशी पिक विम्याच्या प्रतिक्षेत शेतकरी आस लावुन बसला आहे. भाजपा सरकारच्या कर्जमाफीत पीक कर्ज तसेच मध्यम मुदतीचे कर्ज समाविष्ट केल्याने पॉलिहाऊस, शेडनेट, शेती उपकरणं, पशुपालन, शेळीपालन, मधमाशीपालन अशा सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. भाजपा सरकारच्या व्यापक कर्जमाफीमुळे ४३ लाख खातेधारकांना १९ हजार कोटींचा लाभ देण्यात आला होता, तूर खरेदीचे निकष महाविकास आघाडी सरकारने बदलल्यामुळे शेतकऱ्यांकडून होणाऱ्या खरेदीचे प्रमाण खूप कमी झाले आहे. शेतकऱ्यांची घोर फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करीत आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक, फसवी कर्जमाफी, बोकाळलेले अवैध धंदे, महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली लक्षणिय वाढ, अचानक मुली बेपत्ता होण्याच्या वाढलेल्या घटना व सरकारचे मौन याचा निषेध म्हणून भाजपाच्यावतीने एक दिवशीय धरणे आंदोलन पुकारले आहे.आयोजित धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सौ.वैशाली काळे यांनी केले आहे.