August 5, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

अन तिने आपल्या जीवाची पर्वा न करता वाचविले तिचे प्राण , “शौर्यगाथा”

अमीन शाह

पालघरच्या विक्रमगड येथील आदिवासी शाळेत ८ वीमध्ये शिकणाऱ्या संजना जेठु राव या विद्यार्थीनीने विहीरीत उतरुन तिसरीतल्या विद्यार्थीनीचा जीव वाचवल्याची घटना समोर आली आहे. कर्हेतलावली या जिल्हा परिषदेच्या शाळेत संजना शिक्षण घेत असून तिच्या शौर्याचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. संजनाला बालशौर्य पुरस्कार देण्याची मागणी देखील सामाजिक संस्थांकडून केली जात आहे.
अनेक आदिवासी पाड्यांप्रमाणे विक्रमगड येथील पाड्यात देखील गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. शाळा सुटल्यावर इथले विद्यार्थी पाणी भरण्यासाठी विहिरीवर जातात. संजना पाण्यासाठी विहिरीवर गेली असता तिसरीत शिकणारी जागृती विष्णू राव देखील कळशी घेऊन पाण्यासाठी आली होती. अनावधानाने जागृतीचा पाय घसरला आणि ती विहिरीत पडली. हे पाहताच संजनाने डोक्यावरील हंडा खाली ठेवून दगडांच्या कपारीच्या आधारे विहिरीत उतरली. हातपाय हलवत राहा..घाबरु नको असे म्हणत ती जागृतीला धीर देत होती. संजनाने जागृतीला खांद्यावर घेतलं आणि वर येण्याचा प्रयत्न करु लागली विहिरीतल्या दोन दगडांमध्ये खूप अंतर असल्याने तिला ते शक्य होत नव्हतं. अखेर प्रयत्नांची पराकाष्ठा करत संजनाने जागृतीचा जीव वाचवला

एवढ्यावरच संजना थांबली नाही तर तात्काळ जागृतीला घेऊन ती जवळच्या डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी जागृतीची तपासणी केली. जागृतीच्या बोटाला जखम झाली होती त्यावर उपचार करुन तिला घरी सोडण्यात आले. त्यानंतर
ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली आणि संजनाने दाखवलेल्या धाडसाचे कौतूक होऊ लागले. संजनाला याबद्दल विचारले असता, ‘तिला खांद्यावरशी घेतला वरचे दगडावं चढवला न हाताकं वरती ढकलंत व्हतु’ असं आपल्या भाषेत ती उत्तर देते. शाळा आणि ग्रामस्थांनी संजनाचा सत्कार केला.

पाण्याचा प्रश्न या आदिवासी पाड्याच्या पाचवीला पुजलेला आहे. त्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात टाकावा लागतो. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता संजनाने खांद्यावरुन जागृतीला वर आणले आणि डॉक्टरकडे नेले. वयाच्या १४ व्या वर्षी असं प्रसंगावधन दाखवणं ही खूप मोठी बाब असून राज्यशासनाने बालशौर्य पुरस्कारासाठी संजनाचा विचार करायला हवा अशी मागणी समाजसेवक निरंजन आहेर यांनी केली आहे.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!