Home महत्वाची बातमी बुलडाणा पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस शिपायाने केली आत्महत्या

बुलडाणा पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस शिपायाने केली आत्महत्या

28
0

महिला पोलीस व एकावर गुन्हा दाखल

सययद नजाकत / अमीन शाह

जालना , दि. १५ :- जालन्यात एका पोलीस शिपायाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. विष्णू रामराव गाडेकर (वय 35 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचं नाव आहे विष्णू गाडेकर यांनी थायमेंट हे विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची माहिती आहे. अनैतिक संबंधातून महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून विष्णू गाडेकर यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे .

काय आहे प्रकरण?

विष्णू गाडेकर हे बुलढाणा येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. ते मूळचे जाफराबाद तालुक्यातील गवासणी येथील रहिवासी असून सध्या देऊळगाव राजा येथे वास्तव्यास होते. महिला पोलीस कर्मचारीने अनैतिक संबंधामुळे विष्णू गाडेकर यांच्याकडे वारंवार लग्नाची मागणी केली. मात्र, विष्णू गाडेकर यांचं लग्न झालेलं होतं, त्यांना एक मुलगीही होती. त्यामुळे त्यांनी लग्नाला नकार दिला. यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्याने इतर पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीने विष्णू गाडेकर यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, असा आरोप आहे.
महिला पोलीस कर्मचारी विष्णू गाडेकर यांच्याकडे नेहमी पैशांची आणि सोन्याच्या दागिन्यांची मागणी करु लागली. शिवाय, मागणी पूर्ण न केल्यास विष्णू गाडेकर आणि त्यांच्या मुलीला मारण्याची धमकीही दिली. या जाचाला कंटाळून अखेर विष्णू गाडेकर यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, असा आरोप आहे.
या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी विष्णू गाडेकर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप विष्णू गाडेकर यांच्या पत्नीने केला आहे. त्यांच्या तक्रारीवरुन जाफराबाद पोलीस ठाण्यात कलम 306 ,34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित मोरे करत आहेत.