Home यवतमाळ पालकमंत्री संजय राठोड यांची अशीही संवेदनशीलता “अपघातग्रस्त दाम्पत्यास मदतीचा हात”

पालकमंत्री संजय राठोड यांची अशीही संवेदनशीलता “अपघातग्रस्त दाम्पत्यास मदतीचा हात”

792

यवतमाळ – नेत्यांचा ताफा रस्त्याने कायम भरधाव जाणार हे गृहीत असते. मात्र संवेदना जपत प्रवास करणारे राजकीय नेते लाभले तर सर्वसामान्यांच्या सुख, दु:खात रात्री, अपरात्री ते धावून जातात. याचाच प्रत्यय शुक्रवारी रात्री यवतमाळ-अमरावती मार्गावर पालकमंत्री संजय राठोड यांच्या मदतीमुळे एका अपघातग्रस्त दाम्पत्यास आला.

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे शुक्रवारी रात्री नेर येथून आपल्या ताफ्याने यवतमाळकडे येत होते. सोनखास ते लासीना दरम्यान दुचाकीस्वार दाम्पत्यास अज्ञात वाहनाने धडक दिली होती. हे दाम्पत्य रस्त्याच्या कडेने जखमी अवस्थेत विव्हळत पडून होते. त्याचवेळी पालकमंत्री संजय राठोड यांचा ताफा रस्त्यावरून जात होता. अपघाताचे हे दृश्य बघताच मंत्री संजय राठोड यांनी आपला ताफा थांबविला. त्यांनी तत्काळ त्यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनातून या दाम्पत्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्याच्या सूचना केल्या. यवतमाळ येथे वैद्यकीय महाविद्यालयात आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देवून डॉक्टरांशीही चर्चा केली. यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी जखमींची आस्थेने विचारपूस केली. त्याच दरम्यान रूग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचली. या जखमी व्यक्तींना तातडीने रूग्णवाहिकेतून यवतमाळकडे रवाना करण्यात आले. मंत्री संजय राठोड यांनी आपल्या ताफ्यातील पोलिसांचे सुरक्षा वाहन या रूग्णवाहिकेसोबत देवून जखमींवर उपचार होईपर्यंत दवाखान्यात थांबण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना केल्या. पालकमंत्री संजय राठोड यांच्या या संवेदनशील कृतीने दोन जखमी व्यक्तींना वेळीच उपचार मिळून त्यांना जीवदान मिळाले. यावेळी उपस्थित गावकरी आणि रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या कृतीबद्दल कौतुक करत धन्यवाद मानले.