Home यवतमाळ वणी उपविभागात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; एसडीपीओंची ‘निवडक कारवाई’ की हेतूपुरस्पर दुर्लक्ष? 

वणी उपविभागात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; एसडीपीओंची ‘निवडक कारवाई’ की हेतूपुरस्पर दुर्लक्ष? 

501
 वणी ( प्रतिनिधी  ) –  वणी उपविभागात मटका जुगार, कोंबड बाजार यांसारखे अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असताना पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत आहे. विशेष म्हणजे या सर्व घडामोडींमध्ये एसडीपीओंचे लक्ष केवळ वणी शहरापुरतेच मर्यादित असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
वणी शहरात काही मटका अड्ड्यांवर धाड टाकून कारवाईचा देखावा करण्यात आला. मात्र ही कारवाई निवडक आणि दिखाऊ असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. कारण शहरातील ज्योती बारच्या गल्लीत व लालगुडा चौपाटीवरील मटका अड्डे मात्र आजही पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे खुले गुपित आहे.
 उपविभाग फक्त वणी शहरापुरताच मर्यादित आहे का?
वणी उपविभागात येणाऱ्या शिरपूर, मारेगाव, मुकुटबन, पाटण या पोलीस स्टेशन हद्दीत मटका जुगार, कोंबड बाजार व इतर अवैध व्यवसाय खुलेआम सुरू आहेत. स्थानिक नागरिक वारंवार तक्रारी करत असतानाही संबंधित पोलीस स्टेशनमध्ये ठोस कारवाई होत नसल्याने एसडीपीओंची भूमिका हेतूपुरस्पर असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.
 कारवाईचा देखावा, पण मटका माफिया बेधडक
एकीकडे काही ठराविक अड्ड्यांवर धाड टाकून ‘कारवाई झाली’ असा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो, तर दुसरीकडे प्रभावशाली मटका अड्डे मात्र सुरक्षित ठेवले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे “पोलीस कारवाई ही कायद्याची अंमलबजावणी आहे की सेटिंगचा भाग?” असा सवाल उपस्थित होत आहे.
 नागरिकांचा थेट सवाल – 
“जर एसडीपीओ खरोखरच गंभीर असतील, तर संपूर्ण उपविभागात एकाचवेळी कारवाई का होत नाही?”
“वणी शहरातच धाडसत्र आणि ग्रामीण भागात मोकळे रान का?”
 वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की मौन समर्थन?
या संपूर्ण प्रकरणात जिल्हा पोलीस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. वेळेत लक्ष न दिल्यास अवैध व्यवसायांचे जाळे अधिक मजबूत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 आता उत्तर अपेक्षित आहे…
वणी उपविभागातील जनतेला आता केवळ कारवाईचे फोटो नव्हे, तर निष्पक्ष, सर्वसमावेशक आणि कठोर कारवाई अपेक्षित आहे. अन्यथा एसडीपीओंच्या कारवाईवर कायमच प्रश्नचिन्ह राहील.