Home मराठवाडा आठ दिवसानंतरही पोलिसांना ठोस कारण सापडेना…

आठ दिवसानंतरही पोलिसांना ठोस कारण सापडेना…

93

आरोपी चे रेखाचित्र जारी

अब्दुल कय्युम

औरंंगाबाद , दि. ११ :- गुलमंडी परिसरातील नगरखाना गल्लीत असलेल्या कुरीअर एजन्सीच्या व्यवस्थापकाच्या हत्येला आठ दिवस उलटून गेले आहेत. सिटीचौक पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजआधारे मारेकर्‍यांचा शोध लावण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिस कोणत्याही निकषापर्यंत पोहचू न शकल्याने पोलिसांनी आरोपीचे रेखाचित्र जारी केले असल्याची माहिती सिटीचौक पोलिस ठाण्याच्या सुत्रांनी दिली.

गुलमंडी परिसरातील नगरखाना गल्लीत राम मोहन कुरीअर एजन्सीचे कार्यालय आहे. या कार्यालयात व्यवस्थापक म्हणून काम करणार्‍या प्रकाश पटेल (वय ३३, रा.गुजरात,ह.मु.नगरखाना गल्ली) यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना ३१ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली होती. पटेल यांची हत्या करण्यासाठी आलेल्या मारेकर्‍यांनी तोंडाला रूमाल बांधलेले असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही.
दरम्यान, सिटीचौक पोलिस ठाण्याचे एक पथक आठ दिवस गुजरात येथे चौकशी करण्यासाठी गेले होते. या पथकाच्या हाती कोणतेही धागेदोरे लागलेले नसल्याने हे पथक ९ फेब्रुवारी रोजी शहरात परतले. पोलिसांना मारेकर्‍यांचा कोणताच सुगावा लागत नसल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणार्‍या चेहर्‍याच्या आधारे आरोपीचे रेखाचित्र तयार करून जारी केले आहे.