Home मराठवाडा अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेप

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेप

58
0

अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

अमीन शाह

अंबाजोगाई , दि. १० :- अल्पवयीन मुलीस गुंगीचे औषध देऊन तिच्या वारंवार अत्याचार करणाऱ्या तिच्या नात्यातील नराधमास अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. एम.बी. पटवारी यांनी मरेपर्यंत जन्मठेप आणि एकूण ६० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. अत्याचाराची ही घटना परळी तालुक्यात घडली होती.

तीन वर्षापूर्वी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयातील डॉक्टरांच्या समयसुचकतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले होते. परळी तालुक्यातील एक कुटुंब सध्या अंबाजोगाई वास्तव्यास आहे. २०१२ साली या कुटुंबातील १० वर्षीय मुलगी सुटी निमित्त गावाकडे गेली होती. त्यावेळी तिच्या नात्यातील भगवान अप्पासाहेब दळवे (तत्कालीन वय ३२) याने अन्य अल्पवयीन मुलींच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत पिडीतेला थंड पाण्यातून गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतरच्या वर्षांच्याही सुट्यात भगवानने कधी चॉकलेट तर कधी पाण्यातून पिडीतेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला. कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी भगवानने दिल्याने पिडीतेने या अत्याचाराची कुठेही वाच्यता केली नाही. त्यामुळे हिम्मत वाढलेला भगवान २०१६ साली डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात थेट अंबाजोगाई शहरात पिडीतेच्या शाळेत गेला आणि वडील आल्याचे कारण सांगून तिला बाहेर घेऊन आला. त्यानंतर त्याने तिला पाण्यातून गुंगीचे औषध दिले. योगेश्वरी देवी मंदिर, मुकुंदराज आदी ठिकाणी फिरवून नंतर लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पिडीतेचे पोट दुखू लागल्याने तिला आजीने स्वाराती रुग्णालयात नेले. तपासणी दरम्यान डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पिडीतेला विचारणा केली असता तिच्यावरील अत्याचाराला वाचा फुटली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर पिडीतेच्या फिर्यादीवरून आरोपी भगवान दळवे याच्यावर सिरसाळा पोलिस ठाण्यात बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एम.एल. जाधव यांनी केला. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल आनंद यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. याप्रकरणी न्यायालयात एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद तपासल्यानंतर अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. एम.बी. पटवारी यांनी भगवान दळवे याला दोषी ठरविले. त्याला कलम ३७६(२) नुसार सश्रम जन्मठेप आणि २० हजार रुपये दंड, कलम ३२८ नुसार १० वर्ष सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंड, कलम ५०६ नुसार ७ वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावलीआहे. पोक्सो कायद्यानुसारही आरोपीला दोषी ठरवण्यात आले आहे परंतु त्यापेक्षा जास्त असलेली जन्मठेपेची शिक्षा आरोपीला सुनावण्यात आलेली असल्यामुळे वेगळी शिक्षा देण्यात गरज नाही असे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने सहा. सरकारी अभियोक्ता लक्ष्मण फड यांनी काम पहिले. त्यांना पैरवी अधिकारी गोविंद कदम, पो.कॉ. राहुल शेप आणि पो.कॉ. बी.एस.सोडगीर यांची मदत झाली.

▪ आरोपीने रिक्षाचालकास केली होती मारहाण :

अंबाजोगाईत योगेश्वरी देवीचे दर्शन घेतल्यानंतर आरोपीने गुंगीत असलेल्या पिडीतेला रिक्षात बसवून छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेले. त्यानंतर पुन्हा रिक्षा वळवून मुकुंदराज मंदिराकडे घेण्यास सांगितले. परंतु, मुलीची अवस्था बघून रिक्षाचालकाने हिला रुग्णालयात न्यायचे सोडून मुकुंदराजकडे कशाला नेत आहात अशी विचारणा केली. त्यावर आरोपीने रिक्षाचालकाला मारहाण केली आणि दुसऱ्या रिक्षातून पिडीतेला मंदिराकडे घेऊन गेला.

▪ डॉक्टर आणि पोलिसांमुळे प्रकरण उघडकीस :

वैद्यकीय तपासणीत पिडीतेवर अत्याचार झाल्याचे लक्षात आल्यानंतर स्वाराती रुग्णालयातील डॉ. अश्विनी अमृतवार आणि डॉ. स्वाती अग्रवाल यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली होती. सुरुवातीस याबाबतीत तक्रार देण्यास पिडीतेच्या कुटुंबीयांनी नकार दिला होता. परंतु पोलिसांनी पीडिता आणि तिच्या माता-पित्याला धीर देत त्यांची समजूत घातली. त्यानंतर पिडीतेने तक्रार दिली आणि ती त्यावर ठाम राहिली. पिडीतेचा जबाब, पोलिसांचा सखोल तपास आणि सरकारी वकिलांचा खंबीर युक्तिवाद नराधमास शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यात सर्वात महत्वाचा ठरला.