Home बुलडाणा मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या दोन महिलांना बंदूक व शस्त्राचा धाक दाखवून लुटले ,

मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या दोन महिलांना बंदूक व शस्त्राचा धाक दाखवून लुटले ,

504

 

चोरटे गाडी सोडुन पसार ,

 

अमीन शाह

बुलडाणा ,

सिंदखेडराजा येथे सकाळी दर्शनासाठी मोठ्या महादेवाच्या मंदिराकडे जाणाऱ्या दोन महिला, सौ. आसराबाई मुंडे आणि त्यांच्या सोबतच्या एका महिलेला अचानक अज्ञात चारचाकी गाडीने अडवले. गाडीतून उतरलेल्या चोरट्यांनी त्यांच्यावर पिस्तूल आणि चाकूने हल्ला केला. डोळ्यासमोर मृत्यू उभा असतानाही या दोन्ही महिला घाबरल्या नाहीत. त्यांनी प्रसंगावधान राखत मोठ्या हिमतीने प्रतिकार केला. चोरट्यांनी त्यांच्या नाकातील आणि कानातील सोन्याचे दागिने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पण या महिलांनी आरडाओरडा करत हातात मिळेल त्या दगड आणि गोट्यानी चोरट्यांवर हल्ला सुरू केला.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे चोरट्यांचीही भंबेरी उडाली. महिलांचा जोरदार प्रतिकार पाहून चोरट्यांना पळ काढावा लागला. चोरटे काही दागिने घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले असले तरी, या महिलांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे आणि गावातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच सिंदखेड राजा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप यांनी तात्काळ आपल्या टीमसोबत घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने चोरांचा शोध सुरू केला. पोलिसांनी चिंचोली जहागीर येथे चोरट्यांची एमएच ०१ बीबी ३४३८ क्रमांकाची संशयित गाडी जप्त केली आहे, मात्र चोरटे अद्याप फरार झाले आहेत. पोलीस अधिक तपास करत असून लवकरच आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले या घटनेने सिंदखेड राजा शहरात एकच खळबळ उडाली आहे.