
जिल्हा प्रतिनिधी – डॉ आशिष अटलोए
इंग्रजांच्या विरोधात जनमत निर्माण व्हावे, याकरिता भारतीय लोक एकत्र येणे गरजेचे होते. अशा हेतूने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यांनी त्यामाध्यमाने हेतू साध्य करीत देशाचे भले केले. आता आपल्याला वाईट प्रथांच्या विरोधात लढायचे आहे.
दहशतवाद्यांचा सामना करायचा आहे. या स्थितीत समाजासाठी चांगले उपक्रम राबवणे काळाची गरज आहे. याकरिता गणेश मंडळांचा दूरगामी उपयोग होऊ शकतो. अगदी हीच लोकभावना लक्षात घेता सर्व गणेश मंडळांनी समाजाला उपयोगी पडतील, असे उपक्रम राबवावेत असे आवाहन प्रतापनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज बोंडसे यांनी केले.
सोमवार ११ ऑगस्ट रोजी परिमंडळ क्रमांक १ चे पोलिस उपायुक्त, सोनेगाव विभागाचे सहायक पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी गणेशोत्सव २०२५ निमित्ताने हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याच बैठकीत ठाणेदार पंकज बोंडसे यांनी आपली भूमिका मांडत समाजोपयोगी उपक्रमावर भर दिला.
बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार गणेशोत्सव मंडळातर्फे गरजू व्यक्तींना मदत होईल, अशी उपक्रमे राबवावे.
मिरवणुकी दरम्यान लेझर लाईटचा किंवा डीजे साऊंड सिस्टमचा वापर करू नये. विसर्जनाच्या वेळी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. कोणीही जबरदस्ती वर्गणी गोळा करणार नाही, आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्व गणेश मंडळांनी अनंत चतुर्थीचे दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन केले पाहिजे. मूर्तीचे स्टेज पेंडॉल मजबूत बांधावे. मूर्तीची विटंबना होणार नाही याची दक्षता घ्यावी. मूर्ती जवळ २४ तास स्वयंसेवक नेमावे. सर्व सदस्य स्वयंसेवक यांना ओळखपत्र द्यावे. पेंडॉलमध्ये तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावल्या जातील अशी कोणतीही कृत्य करणार नाही. सोशल मीडियाचा वापर करताना कोणीही कोणत्याही अफवावर विश्वास करू नये. कोणतेही आक्षेपार्ह पोस्ट व्हिडिओ मेसेज व्हायरल करू नये. कोणतीही माहिती मिळाल्यास तत्काळ त्याची माहिती पोलिसांना द्या असे आवाहन यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज बोंडसे यांनी केले.











































