
यवतमाळ, दि. 01 जुलै 2025 :
यवतमाळ शहर व अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या दोन वेगवेगळ्या छापेमारीत दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण ₹12,08,500/- किमतीचा अवैध शस्त्रसाठा आणि अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रकरण 1 – रणबीर रमन वर्मा (रा. दर्डा नगर, यवतमाळ)
दिनांक 30 जून 2025 रोजी सपोनि संतोष मनवर व त्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, रणबीर वर्मा नावाचा इसम बेकायदेशीर शस्त्रसाठा घेऊन पांढरकवडा रोडने येणार होता. पथकाने सापळा लावून त्याला थांबवले असता, तो होंडा अॅक्टिवा (MH-29-AE-9975) वरून आला. त्याच्या ताब्यातून:
5 विविध प्रकारची अग्निशस्त्रे
350 जिवंत काडतुस
धारधार तलवार
बुलेट प्रुफ जॅकेट
एक जीप वाहन
असा एकूण ₹7,78,500/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 665/2025 अंतर्गत शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात या शस्त्रांचा स्रोत उत्तराखंड असल्याचे समोर आले आहे. तसेच, आरोपी रणबीर वर्मा याच्यावर यापूर्वी दिल्ली व इतर ठिकाणीही अवैध शस्त्र प्रकरणी गुन्हे नोंद असल्याची माहिती आहे. त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.
—
प्रकरण 2 – मो. अश्फार मो. असलम मलनस उर्फ भाया (रा. तेलीपुरा, यवतमाळ)
या कारवाईदरम्यानच पथकाला मिळालेल्या दुसऱ्या गोपनीय माहितीनुसार, मो. अश्फार नावाचा इसम पंप अॅक्शन गन घेऊन शहरात फिरत होता. नागपूर-तुळजापूर महामार्गावरील सापळ्यात त्याला अटक करण्यात आली. त्याच्या टाटा झेस्ट वाहनातून (MH-14-GD-0537) खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:
1 पंप अॅक्शन गन
5 जिवंत काडतूस
चारचाकी वाहन व मोबाईल
एकूण ₹4,30,000/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 984/2025 दाखल करण्यात आला आहे.
—
पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शन, स्थानिक गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी
या संपूर्ण कारवाईचे मार्गदर्शन मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिता व अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुष जगताप यांनी केले.
पोलीस निरीक्षक श्री. सतिश चवरे, सपोनि संतोष मनवर व त्यांच्या सहकारी कर्मचारी – निलेश राठोड, रितुराज मेडवे, प्रशांत हेडाऊ, सचिन घुगे, आकाश सहारे – यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
या कामगिरीबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व पथक अभिनंदनास पात्र असून, यवतमाळ जिल्ह्यातील अवैध शस्त्रसाठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभाग कटिबद्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.












































