Home अमरावती अमरावती वाहतूक पोलिसांकडून यवतमाळच्या वाहनचालकांची लूट तात्काळ थांबवावी — अनिल गायकवाड यांची...

अमरावती वाहतूक पोलिसांकडून यवतमाळच्या वाहनचालकांची लूट तात्काळ थांबवावी — अनिल गायकवाड यांची मागणी

473

यवतमाळ ते अमरावती दरम्यानचा व्हाया चांदू रेल्वे रस्ता हा अत्यंत उत्तम दर्जाचा व सुरळीत रस्ता असून, या रस्त्याच्या गुणवत्तेमुळे वाहनांचे वेगाने चालणे नैसर्गिक आहे. मात्र या मार्गावर आणि अमरावती शहराच्या प्रवेशद्वाराजवळ वाहतूक पोलिसांकडून केवळ 50 किमी/तास आणि काही भागात तर फक्त 30 किमी/तास अशी अतिशय कमी स्पीड लिमिट आखून देण्यात आलेली आहे.

या मर्यादेचे थोडेसेही उल्लंघन झाल्यास वाहनचालकांवर 2000 रुपयांपर्यंत दंड ठोठावला जात आहे. विशेष बाब म्हणजे, अमरावती वाहतूक पोलिसांकडून मुख्यतः एमएच-29 (यवतमाळ पासिंग) असलेल्या वाहनांनाच लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे, जे अत्यंत अन्यायकारक आणि पक्षपाती स्वरूपाचे आहे.

यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अनिल गायकवाड यांनी यासंदर्भात तीव्र निषेध व्यक्त करत सांगितले की:

“यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी, सामान्य नागरिक, बी-बियाणे खरेदीसाठी, शेतीसामग्री मिळवण्यासाठी, तसेच गरीब रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी अमरावतीकडे प्रवास करतात. आजच्या महागाईच्या काळात आधीच जनतेची कंबर मोडली आहे. अशा स्थितीत केवळ यवतमाळच्या वाहनचालकांना लक्ष करून त्यांच्या खिशावर लूट करणं हे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे.”

रस्त्याच्या गुणवत्तेनुसार स्पीड लिमिट वाढवणे, अन्यायकारक दंड थांबवणे, आणि सर्व वाहनचालकांवर समान न्यायाची अंमलबजावणी ही नागरिकांची न्याय्य मागणी आहे.

गायकवाड यांनी अमरावती वाहतूक विभागाकडे आणि प्रशासनाकडे तात्काळ सुधारणा करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, हा मुद्दा जनआंदोलनाच्या माध्यमातून शासन दरबारी नेण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.