Home यवतमाळ पंढरपूरला रविवारी यवतमाळातून जाणार दिव्यांगांची वारी

पंढरपूरला रविवारी यवतमाळातून जाणार दिव्यांगांची वारी

339

३० दृष्टीहिनांचा सहभाग, ५२१ किमी चालणार

यवतमाळ – आषाढी एकादशी महिनाभरावर आली आहे. अवघ्या महाराष्ट्रास पांडूरंगाच्या भेटीची आस लागली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी जयहरी विठ्ठलचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. या वारीत गेल्यावर्षीपासून यवतमाळातून निघणाऱ्या दृष्टीहिनांच्या दिव्यांग वारीने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. यावर्षी ही दिव्यांग वारी रविवार, १५ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे.
यवतमाळ येथील सेवा समर्पण प्रतिष्ठानने गेल्यावर्षी प्रथमच दिव्यांगांची पायी वारी काढली. सेवा समर्पणमध्ये ३० दृष्टीहीन वास्तव्यास आहेत. या दिव्यांगांना पंढरपूरच्या वारीत घेवून जायची कल्पना सेवा समर्पण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत बनगिनवार यांच्या डोक्यात आली. त्यांनी दृष्टीहीन बांधवांची वारीच पंढरपूरला घेवून जायचा निश्चय केला आणि गेल्यावर्षी राज्यातून दिव्यांगांची पहिली दिंडी पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटी गेली. यावर्षीसुद्धा दिव्यांगांची ही वारी पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीस जाणार आहे. रविवार, १५ जून रोजी सकाळी साडेआठ वाजता स्थानिक ओम सोसायटीतील सिद्धीविनायक गणपती मंदिरातून संत सूरदास यांची प्रतिमा व पादूका घेवून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
आर्णी, दिग्रस, पुसद, कळमनुरी, परभणी, परळी, अंबेजागाई, कुर्डूवाडी, पंढरपूर असा २२ दिवस ५२१ किमीचा पायी प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर येथे पोहचणार आहे. दररोज किमान २० ते २५ किमीचा प्रवास करणार असून, मार्गात भजन, कीर्तन असे कार्यक्रमही हे बांधव घेणार आहे. या वारीत २५ दृष्टीहीन मुलं आणि पाच मुली, १० कार्यकर्ते असे ४० वारकरी सहभागी होणार आहेत. या वारीसोबत तीन वाहने राहणार असून सेवा समर्पण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत बनगीनवार, प्राची बनगीनवार, प्रशांत परसोडकर यांचा परिवार व प्रमोद जनगडे यांचा परिवार या वारीत दृष्टीहीन बांधवांसोबत पूर्णवेळ राहणार आहे. वारीसाठी समाजातील विविध स्तरातून आर्थिक व इतर सहकार्य सुरू आहे. ईसीई इंडिया, सोलर पॅनल उत्पादक कंपनीने या वारीचे सहप्रायोजकत्व स्वीकारले आहे. यवतमाळातील संकल्प फॉऊंडेशन वारीसाठी विशेष सहकार्य करत आहे. प्रा. माणिक मेहरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्ता देशपांडे हे अंध मुलांकडून भजन, भक्तीगीतांची तयारी करून घेत आहेत. सेवा समर्पणचे सचिव अनंत कौलगीकर, संचालक सुरेश राठी, दीपक बागडी, डॉ. अलोक गुप्ता हे वारीचे नियोजन सांभाळत आहेत. या वारीला पंढरपुरकडे रवाना करण्यासाठी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन सेवा समर्पणने केले आहे.