Home यवतमाळ यवतमाळ नगरपरिषदेचा हलगर्जीपणा:फॉगींग मशीन अदृश्य झाली का?

यवतमाळ नगरपरिषदेचा हलगर्जीपणा:फॉगींग मशीन अदृश्य झाली का?

315
नागरिकांचा संताप, प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा
यवतमाळ – शहरात अवकाळी पावसामुळे अनेक भागांत गटारे, नाले चोख न साफ केल्याने साचलेल्या पाण्यातून डेंग्यूचे विषाणू पसरू लागले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात मनोज गेडाम आणि इतर वंचित नागरिकांनी जिल्हाधिकार व यवतमाळ नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत तात्काळ पावले उचलण्याची मागणी केली आहे.
या निवेदनात नगर परिषदेच्या अकार्यक्षमतेवर संताप व्यक्त करत यंदा देखील पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, गटारी सफाई, मच्छर नियंत्रण, फॉगींग मशीन वापर आदी बाबतीत कोणतीही ठोस कृती न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल असा स्पष्ट इशारा दिला आहे.

नगर परिषदेमध्ये मागील तीन वर्षांपासून प्रशासक राज असल्यामुळे मुख्याधिकारी स्वतःला “मुगलकालीन बादशहा” किंवा “ब्रिटीशकालीन गव्हर्नर” समजू लागल्याचा आरोप करत निवेदनात म्हटले आहे की, जनतेच्या आरोग्याशी सर्रास खेळ होत असून कोणतीही प्रशासनिक संवेदना शिल्लक राहिलेली नाही.
गेल्या वर्षी अशाच प्रकारे नालेसफाई न केल्यामुळे एका महिलेचा गटारात पडून मृत्यू झाला होता, परंतु त्यातून कोणताही बोध घेण्यात आला नाही. तसेच सफाई कामांची फक्त वरवरची दिखावट करून बोगस बिले काढली जात असल्याचा आरोप आरोग्य विभागावर करण्यात आला आहे.
नगरपरिषदेच्या फॉगींग मशिनचा वापर सध्या होताना दिसत नसल्याने, ती मशिन अदृश्य झाल्याची शक्यता वर्तवून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः याचा तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे. शहरात खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये डेंग्यू व इतर संसर्गजन्य आजारांचे रुग्ण वाढत असताना मच्छर नियंत्रणासाठी कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही, हे अत्यंत गंभीर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गुरूदेव सेवा संघ व नागरिकांच्या वतीने प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे की, भविष्यात जर डेंग्यू किंवा नाले-गटारे यांच्यामुळे कुणाचा जीव गेला तर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. असा इशारा यावेळी नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्ते मनोज गेडाम यांनी व्यक्त केली आहे.