Home यवतमाळ 31 मे जागतिक तंबाखू निषेध दिवस विशेष….

31 मे जागतिक तंबाखू निषेध दिवस विशेष….

265
तंबाखूची नशा जीवनाची दुर्दशा’
31 मे रोजी पूर्ण जग जागतिक तंबाखू निषेध दिवस साजरा करतो. तंबाखूमुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम अधोरेखित करण्यासाठी व या घातक सवयी सोडण्यासाठी लोकांना प्रेरित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
एक दंत वैद्यक तज्ञ म्हणून दैनंदिन जीवनात मी बरेच मुखकर्करोगाचे रुग्ण पाहतो. जेव्हा त्यांना कळते की की त्यांना मुख कर्करोग झाला आहे तेव्हा त्यांच्या तोंडावर उमटणारे दुःख , व्यसन न सोडल्याचा झालेला पश्चाताप – हे दृश्य असह्य असते. तेव्हा जाणवते की त्यांनी जणू स्वतःच्या हाताने स्वतःचा गळा दाबला आहे. ते म्हणतात ना जेव्हा पाणी डोक्यावरून जातं तेव्हाच त्याची खोली लक्षात येते.
पण ही वेळ येण्यापूर्वीच जर आपण जागरूक झालो तर अशा भयानक परिणामांना टाळता येऊ शकते त्यामुळेच केलेला हा वैचारिक उहापोह!

मुख कर्करोग हा एक असा भस्मासुर आहे जो येण्याआधी बरेच पूर्व लक्षणे दाखवतो हीच जर वेळेत आपण ओळखली तुमच्या डॉक्टरचा सल्ला घेतला तर आपण याला वेळीच हरवू शकतो. तंबाखू, गुटखा पान मसाला यांसारख्या बऱ्याच सवयीमुळे तोंडात तयार झालेला एक छोटासा पांढरा चट्टा भविष्यात येणाऱ्या मोठ्या धोक्याची पूर्व घंटा असू शकते. ही पूर्व लक्षणे बऱ्याच स्वरूपाची असू शकतात जसे की तोंड न उघडणे, तोंडात पांढरे किंवा लाल चट्टे तयार होणे, विविध प्रकारचे हिरड्यांचे आजार, तोंडातून दुर्गंधी येणे, जेवण गिळताना त्रास होणे त्रास होणे इत्यादी
जर या सवयी दारूच्या व्यसनाच्या सोबत असतील तर याचा परिणाम अधिक तीव्र होतो. याच्यामध्ये दोन आणि दोन मिळून चार न होता त्याचे बावीस होतात कारण दारू ही आपल्या तोंडातील श्लेष्मल त्वचेची शोषण्याची क्षमता वाढवते ज्यामुळे तंबाखू मधील कर्करोगास कारणीभूत घटक अधिक वेगाने प्रवेश करतात.
तंबाखू सोडण्याचा लागणारा प्रवास अवघड आहे पण अशक्य नाही. यासाठी लागणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे सवय असणाऱ्या व्यक्तीचा दृढ निश्चय,त्याच्या आंतरिक मनातून तयार झालेली स्वयंप्रेरणा ही सर्वात जास्त फायद्याची ठरते याला बळकटी देण्यासाठी आम्ही दंतवैद्य त्यांना समुपदेशन करतो ,निकोटीन रिप्लेसमेंट थेरेपी सुरू करता येते, आणि लक्षणा अनुरूप उपचार केले जातात. हे सर्व मिळून त्या व्यक्तीला सवयी पासून मुक्त होण्यास मदत करतात
आम्ही जेव्हा अशा पेशंटचे समुपदेशन करतो तेव्हा “कॅन्सर बिनसर आम्हाला काही असलं होत नाही”, , “अमुक व्यक्ती मागील 40 वर्षापासून तंबाखू खातो, तरी त्याला काहीच झाले नाही”,
‘तमुक व्यक्तीने जीवनात कधीच तंबाखू खाल्ली नाही तरी त्याला कॅन्सर झाला’ असे अनेक बोल ऐकायला मिळतात. हि तुलना चुकीची आहे ,व्यसनाधीन व्यक्ती पुन्हा व्यसन करण्यासाठी विविध पळवाटा शोधत असतो व एका प्रकारे स्वतःच्या मनाला खोटी आशा देत असतो आणि हीच मानसिकता संकटाची खरी सुरुवात असते. तंबाखूमुळे कॅन्सर होतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे जे विविध पुराव्यानिशी सिद्ध झाली आहे. हे आपण कधीच विसरता कामा नये.
या ३१ मे रोजी, जागतिक तंबाखू निषेध दिवसाच्या निमित्ताने, आपण स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आणि समाजासाठी एक सकारात्मक पाऊल उचलूया.
तंबाखूचे दुष्परिणाम केवळ वैयक्तिक आरोग्यापुरते मर्यादित नसतात, तर ते संपूर्ण कुटुंबाच्या जीवनमानावर परिणाम करतात. याच दृष्टीने यवतमाळ स्थित सचेत फाउंडेशन यवतमाळ युवा वर्गाला केंद्रस्थानी ठेवून समाज उपयोगी विविध उपक्रम राबवते.

डॉ ज्ञानेश व्यास
दंतवैद्यक