Home यवतमाळ पालकांना जागृत व्हा – बालकांच्या सुरक्षिततेसाठी सजगतेची गरज

पालकांना जागृत व्हा – बालकांच्या सुरक्षिततेसाठी सजगतेची गरज

624
दीपक यंगड
लोहारा, यवतमाळ –  अलीकडे लोहारा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या चौसाळा जंगलात घडलेली एक धक्कादायक घटना संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजवणारी ठरली आहे. एका शिक्षिकेने स्वतःच्या पतीचा, जो की शिक्षक होता, विष घालून खून केला आणि मृतदेह नष्ट करण्यासाठी काही शालेय विद्यार्थ्यांची मदत घेऊन त्याला जंगलात जाळून टाकले.

या घटनेत सर्वात चिंताजनक बाब म्हणजे शालेय वयातील विद्यार्थ्यांचा वापर एका गंभीर गुन्ह्यात करण्यात आला. विद्यार्थ्यांना भावनिक साथ आणि चुकीच्या विश्वासात ठेवून त्या शिक्षिकेने त्यांचा वापर केला. परिणामी, हे तीन विद्यार्थी आता विधीसंग्रस्त बालगृहात दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेमुळे समाजात आणि विशेषतः पालकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. मुलांचं मन नाजूक असतं, ते पटकन विश्वास ठेवतात आणि भावनिकदृष्ट्या गुंततात. याच गोष्टीचा गैरफायदा घेतलेला दिसतो. शिक्षकी पेशासारख्या पवित्र व्यवसायात असलेल्या एका महिलेने अशा प्रकारचं कृत्य केल्याने समाजात नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
परिसरात वाढणारे सामाजिक धोके
या घटनेपूर्वीही अशाच स्वरूपाची घटना दत्त चौक परिसरात घडली होती. एका किरकोळ वादातून, म्हणजे गाडीचा कट लागल्यामुळे, एका विद्यार्थ्याने आपल्या मित्रांच्या मदतीने दुसऱ्या विद्यार्थ्याचा खून केला होता.
या घटनांचा अभ्यास केल्यास लक्षात येते की समाजातील काही समाजकंटक, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मुलांचा गैरवापर करीत आहेत. मुलांना व्यसनाधीन करण्याचे प्रयत्न, सोशल मीडियाच्या आहारी नेणे, चुकीच्या सवयी लावणे – या गोष्टी सातत्याने वाढत आहेत.
सोशल मीडिया – रियल की रील?
आजकाल सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परंतु ही रील लाइफ आहे, रिअल लाइफ नव्हे, हे समजावून देणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर दाखवले जाणारे दिखाऊ आयुष्य, हिंसक व्हिडिओज, चुकीचे ट्रेंड्स – हे सर्व मुलांच्या मनावर विपरीत परिणाम करतात.
पालकांनी घ्यावी सजगता
या पार्श्वभूमीवर पालकांनी सजग राहणे अत्यंत आवश्यक आहे. आपला मुलगा किंवा मुलगी कोणासोबत वावरतो? तो शाळेत नियमित जातो का? कोणत्या ट्युशन क्लासला जातो? त्याचे मित्र कोण आहेत? तो मोबाईलमध्ये काय पाहतो? कोणत्या छंदात गुंतलेला आहे? या सर्व गोष्टी लक्षात घेणे ही काळाची गरज आहे.
केवळ पैसे कमावण्याच्या धावपळीत आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये. मुलांच्या सुरक्षिततेसाठी वेळ देणं, त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांचं निरीक्षण करणं – ही आजच्या काळातील मूलभूत पालकत्वाची गरज आहे.
जिल्ह्यात घडणाऱ्या घटना एक गंभीर इशारा आहेत. समाजात घडणाऱ्या घडामोडींपासून आपले मुलं सुरक्षित राहावीत, यासाठी सजग पालकत्व हाच उपाय आहे. शिक्षणसंस्था, समाज आणि पालक यांनी एकत्र येऊन यासाठी प्रयत्न करणे ही काळाची मागणी आहे.
पालक जागृत झाले, तरच बालक सुरक्षित राहील!