Home यवतमाळ अवैध मद्यविक्रीबाबत धाब्यांवर संयुक्त तपासणी मोहिम राबवा – जिल्हाधिकारी विकास मीना

अवैध मद्यविक्रीबाबत धाब्यांवर संयुक्त तपासणी मोहिम राबवा – जिल्हाधिकारी विकास मीना

446

 अवैध मद्यविक्री प्रतिबंध समितीचा आढावा

 हातभट्टीविरोधात जिल्हाभर कारवाईचे निर्देश

यवतमाळ, दि.19 –  कोणत्याही प्रकारचा मद्यविक्रीचा परवाना नसतांना जिल्ह्यातील अनेक धाब्यांवर सर्रास मद्यविक्री व मद्य प्राशन केले जाते. या प्रकारावर आळा घालण्यासाठी पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त तपासणी मोहिम राबवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले.

महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक पियुष जगताप, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितेश शेंडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी पियुष चव्हाण यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे अवैध मद्यविक्री होऊ नये. यासाठी जिल्हाभर मोहिम राबवा. परराज्यातून चोरट्या पद्धतीने आलेल्या मद्यांवर नजर ठेऊन कारवाई केली जावी. अवैध आणि बनावट मद्य शासनाचा महसूल बुडवितो शिवाय असे मद्य आरोग्यास देखील अत्यंत हाणीकारक आहे. त्यामुळे अशी विक्री, वाहतूक होणार नाही, यासाठी पोलिस विभागासह उत्पादन शुल्क विभागाने सतर्क राहून कारवाई केली पाहिजे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

जिल्ह्यात सन 2023-24 मध्ये अवैध विक्रीविरोधात 1 हजार 553 गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात 1 हजार 527 आरोपींना अटक करण्यात आली तर 1 कोटी 26 लाख 65 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. जिल्ह्यात सन 2024-25 मध्ये 1 हजार 750 गुन्हे नोंदविण्यात आले. त्यात 1 हजार 754 आरोपींना अटक करण्यात आली तर 2 कोटी 19 लाख 29 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती अधीक्षक नितेश शेंडे यांनी बैठकीत दिली.

मागील वर्षी जिल्ह्यात विविध धाब्यांवर धाडी टाकून 65 गुन्हे दाखल करण्यात आले. यात 80 व व्यक्तींना अटक करण्यात आली. यावर्षी आतापर्यंत 66 धाब्यांवर कारवाई करण्यात आली आहे तर 108 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी धाब्यांवर संयुक्त मोहिम राबविण्यासोबतच हातभट्टीवर देखील संयुक्तपणे जिल्हाभर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागास दिले.