Home बुलडाणा महाराष्ट्र कामगार मंडळाचा विश्वकर्मा गुणवंत पुरस्कार बुलढाणा जिल्ह्याला प्राप्त ,

महाराष्ट्र कामगार मंडळाचा विश्वकर्मा गुणवंत पुरस्कार बुलढाणा जिल्ह्याला प्राप्त ,

318

बुलढाणा:
महाराष्ट्र शासनाच्या कामगार मंडळाचा प्रतिष्ठेचा विश्वकर्मा गुणवंत पुरस्कार 2023 बुलढाण्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी सचिन लक्ष्मणराव पिंगळे यांना नुकताच प्राप्त झाला.राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार, कामगार मंत्री आकाशभाऊ फुंडकर, कामगार विकास आयुक्त तुकाराम मुंढे, कामगार प्रधान सचिव श्रीमती आय.ए.कुंदन यांच्या प्रमुख उपस्थितीत गिरणी कामगार भवन मुंबईमध्ये 13 मे ला प्रदान करण्यात आला.तब्बल सोळा वर्षानंतर मानाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा महाराष्ट्र कामगार मंडळाचा विश्वकर्मा गुणवंत पुरस्कार बुलढाणा जिल्ह्याला प्राप्त झाला. त्यामुळे बुलढाण्यात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने 17 में ला सायंकाळी कामगार नेते शशिकांत इंगळे यांच्या अध्यक्षतेत महाराष्ट्र शासनाचे आभार तथा कामगारांच्या व्यथा,व्यवस्था आणि वास्तविकतेवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
चर्चासत्राला प्रमुख उपस्थिती.
कामगार नेते शशिकांत इंगळे,विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन 1029 चे मंडळ सचिव संतोष पाटील, महावितरण कर्मचारी वर्ग दोन चे पदाधिकारी विलास मानवतकर, महापारेषण चे कर्मचारी दीपक जाधव, अक्षरदेह नाट्यकलावंत मंडळाच्या रेखा इंगळे, आझाद हिंद कामगार संघटनेचे ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील, रमाई ब्रिगेडच्या सुरेखाताई निकाळजे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांनी कामगारांच्या गरजा, व्यथा आणि व्यवस्था यासह शासनाचा विश्वकर्मा पुरस्कार प्राप्त पिंगळे यांचा सत्कार करीत त्यांच्या जीवन कार्यावर अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उमेश कायस्थ श्रीवास्तव,संचालन अतुल सोनुने यांनी तर आभार प्रदर्शन शाहीर सिंधुताई अहेर यांनी केले.
कामगार चळवळीतील विठ्ठल वाघ, विशाल राणे, आकाश सुरडकर, पंचफुलाबाई गवई, सतीश हिवरकर यांच्यासह आयोजक अक्षरदेह नाट्य मंडळ, आझाद हिंद कामगार संघटना, रमाई ब्रिगेड च्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.
____

चर्चासत्रातील कामगार नेत्यांचा दृष्टिक्षेप.

सचिन पिंगळे मुळे जिल्ह्याला गौरव प्राप्त झाला.

कामगारांमध्ये सन्मानाची भावना निर्माण व्हावी. त्यांना मूलभूत सुविधा मिळाव्या. त्यांच्या गरजा आणि अत्यावश्यकतेवर शासन प्रशासनाचा कटाक्ष असावा. संस्था,मंडळ आणि शासन प्रशासनामध्ये आपुलकी, प्रेम, जिव्हाळा निर्माण व्हावा. जेणेकरून सर्वसामान्यांना चांगली सुविधा सेवा मिळेल. कामगारांमध्ये जिद्द चिकाटी वाढावी. कामगारांमध्ये सन्मानाची आणि स्वाभिमानाची भावना जागृत व्हावी. यासाठी दिला जाणारा पुरस्कार निश्चितच बुलढाणा जिल्ह्यासाठी गौरवाची अभिमानाची बाब आहे. त्यामुळे सर्व कामगार संघटनांच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करण्याचा ठराव सुद्धा सर्वांमते पारित करण्यात आला.सचिन पिंगळे यांचे सामाजिक, सांस्कृतिक तथा कामगार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना शासनाचा विश्वकर्मा कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामुळे निश्चितच बुलढाणा जिल्ह्याला गौरव प्राप्त झाला आहे. ज्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवल्या गेला आहे. सोळा वर्षांपूर्वी सदर पुरस्कार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील साहित्यिक, विचारवंत सुरेश साबळे यांना प्राप्त झाला होता.यासह कामगारांचा व्यथा व्यवस्था आणि वास्तविकता या पैलूवर चर्चासत्रातून प्रकाश टाकण्यात आला.