Home यवतमाळ अभिनय क्षेत्रात टिकून राहण्यासाठी जिद्द हवी – अभिनेत्री तेजश्री प्रधान

अभिनय क्षेत्रात टिकून राहण्यासाठी जिद्द हवी – अभिनेत्री तेजश्री प्रधान

370

स्लगलाइन : माऊली फाउंडेशनच्या पदग्रहण सोहळ्यात तेजश्री प्रधान यांची उपस्थिती

यवतमाळ : माऊली फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘माऊली मंच’ या सामाजिक व्यासपीठाच्या स्नेह मिलन व पदग्रहण सोहळ्याचे आयोजन मंगळवारी ‘माऊली सदन’, समर्थवाडी, यवतमाळ येथे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान उपस्थित होत्या.

कार्यक्रमावेळी देशोन्नतीशी संवाद साधताना तेजश्री प्रधान यांनी अभिनय क्षेत्रातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. “या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी केवळ अभिनय कौशल्य पुरेसं नसून, प्रचंड मेहनत आणि जिद्द देखील आवश्यक असते,” असे त्या म्हणाल्या. अभिनयात सातत्याने प्रगती करण्यासाठी जिद्द हीच खरी ताकद असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

विदर्भातील युवक-युवतींना अभिनय प्रशिक्षण देण्याबाबत विचारले असता, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, “विदर्भातून अशी एखादी संधी मिळाल्यास मी ती नक्की स्वीकारेल.”

कार्यक्रमाचे आयोजन माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष जितेश नावडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असलेल्या नावडे यांच्या कार्याचे यावेळी तेजश्री प्रधान यांनी कौतुक केले.

या प्रसंगी माऊली फाउंडेशनच्या उपाध्यक्ष सुजाता जिद्देवार, सचिव मालती नावडे, संचालक नितीशा खासरे, माऊली मंचच्या अध्यक्षा संपदा महाजन, उपाध्यक्ष प्रणाली कहाते, सचिव धनश्री चिकटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन दीपा झिलपे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून सौ. कल्पना बाळासाहेब मांगूळकर, सौ. प्रिया राजू तोडसाम, सौ. वर्षा निकम, सौ. डॉ. सारिका शाह, सौ. मनीषा आखरे यांचीही उपस्थिती होती.