
अमीन शाह ,
जालना येथील सदर बाजार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मांटे यांना चोपडा पोलिसांनी काल बुधवार दिनांक 16 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास रंगेहात पकडले आहे. एवढेच नव्हे तर राज्यात विविध ठिकाणी 27 गुन्हे दाखल असलेल्या आणि अन्य तीन आरोपींसह अशा एकूण चार जणांच्या टोळीला चोपडा पोलिसांनी रंगेहात पकडून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार सोनसाखळी चोरांना पीएसआय प्रल्हाद मांटे हे प्रशिक्षण देत होते. दरम्यान या प्रकरणी प्रल्हाद मांटे यांना जालना पोलीस अधीक्षकांनी सेवेतून तडकाफडकी निलंबित केले आहे. विशेष म्हणजे सेवानिवृत्तीसाठी अवघा एक महिना मांटे यांचा बाकी होता.
चोपडा-चोपडा पोलिसांनी बुधवारी चोरटयानी बस स्थानकावर चोरी केल्यानंतर पळ काढला होता.मात्र पोलिसांनी पाठलाग करून ह्या चोरटयाना पकडले. बुधवारी चोपडा बसस्थानकावर दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास वाळकी गावचे शेतकरी वसंत उखा कोळी यांचे ३५ हजार रूपये बसस्थानकातून चोरी झाले. पोलिसांना चोपड्यात चोरी होणार असल्याची माहिती अगोदरच मिळून गेल्याने त्यांनी चोरटयावर पाळत ठेवून चोरांनी वापरलेल्या इंडिगो कार (क्र एम एच-४३ एन-२९२८ व) या कारचा पाठलाग केला. चोपडा धरणगाव रस्त्यावर त्यांनी कारसह चोरांना अटक केली. त्यात जालना येथील उपनिरीक्षक प्रल्हाद पिराजी मान्टे (वय-५७, रा., सदर बाजार जालना) श्रीकांत भिमराव बघे (वय-२७ रा.गोपालनगर खामगाव) अंबादास सुखदेव साळगावकर (४३ रा. माना तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला,) रउफ अहमद शेख (४८रा महाळस तालुका जिल्हा बीड) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी व स्थानिक चोपडा शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले. यातील अंबादास साळगावकर या आरोपीवर महाराष्ट्रभरात तब्बल २७ गुन्हे दाखल आहेत.तर श्रीकांत बघे याच्यावर शेगाव येथे गुन्हा दाखल आहे.चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे पोलीस उप निरीक्षक जितेंद्र वाल्टे व पोलिस कर्मचारी रितेश चौधरी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे,दीपक माळी, रवींद्र पाटील,पोलिस नाईक हेमंत पाटील यांनी ही कारवाई केली आहे. पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. याबाबत शहरात एकच चर्चा आहे की, पोलिस उपनिरीक्षकच चोर आहे तर मग सामान्य माणसाने न्याय मागायचा कोणाकडे?













































