
नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक १२, नेताजी नगर, यवतमाळ येथे दिनांक १६ एप्रिलला सकाळी ८ वाजता शाळेच्या मुख्याध्यापकानी विद्यार्थ्यांना मैदानामध्ये पाईपलाईन टाकण्यासाठी नालीचे खोदकाम करायला लावून त्यांचे शैक्षणिक नुकसान केले आहे.

नगर परिषदेमध्ये सर्वसामान्य गोरगरीब पालकांची मुलं शिक्षण घेत असतात, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवून त्यांच्याकडून मजुरासारखी कामे करून घेण्यात येत आहे.हे पूर्णपणे बेकायदेशीर असून नियमबाह्य आहे.
शासनाने बालमजुरीस कायद्याने प्रतिबंध केला असला तरी नगरपरिषद शाळांमध्ये मात्र अजूनही विद्यार्थ्यांना मजुरासारखे राबवून बालमजुरी प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन सुरू आहे, यावरून नगरपरिषद शाळांच्या मुख्याध्यापकावर प्रशासनाचे कोणते नियंत्रण राहिले नसून गोरगरीब जनतेच्या मुलांना हिनपणाची वागणूक देण्यात येत आहे, हेच यावरून सिद्ध होते. त्यामुळे ही अतिशय गंभीर बाब आहे.
विद्यार्थ्यांना मजुरा सारखी कामे करण्यास भाग पाडणा-या मुख्याध्यापकावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.












































