Home यवतमाळ यवतमाळ वनविभागाला हादरा! ठिय्या आंदोलनानंतर चौकशी व कारवाईचे आश्वासन

यवतमाळ वनविभागाला हादरा! ठिय्या आंदोलनानंतर चौकशी व कारवाईचे आश्वासन

170

गर्भवती माकडीणीच्या मृत्यूनंतर पेटले यवतमाळ – वनविभागाच्या बेजबाबदार कारभाराविरोधात ठिय्या आंदोलन

यवतमाळ,दि.24 मार्च. – यवतमाळ जिल्ह्यात वन्यजीव संरक्षणाच्या बाबतीत वनविभागाच्या निष्काळजी आणि असंवेदनशील वर्तनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.या ढिसाळ व्यवस्थेचा पर्दाफाश करणारी घटना म्हणजे गर्भवती माकडीणीचा मृत्यू.

माकडीणीचा मृत्यू आणि वनविभागाची उदासीनता!
अलीकडेच एका गर्भवती माकडीणीला गंभीर दुखापत झाली होती.प्रा.पंढरी पाठे व एम.एच.29 हेल्पिंग हॅन्ड वन्यजीव संघटनेच्या सदस्यांनी वेळेत वनविभागाला कळवले,मात्र रेंज फॉरेस्ट ऑफिसच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विलंब दाखवला,आणि वेळेत वैद्यकीय मदत मिळाली नाही.त्यामुळे दोन्ही जीव गमवावे लागले! ही घटना वनविभागाच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कार्यशैलीचे जिवंत उदाहरण ठरली.
या घटनेनंतर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी दिलेल्या निवेदनांकडे दुर्लक्ष करण्यात आले.परिणामी, यवतमाळ जिल्ह्यातील निसर्गप्रेमी, पर्यावरण कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत आज 24 मार्च (सोमवार)रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत यवतमाळ वनभवन येथे ठिय्या आंदोलन छेडले.

ठिय्या आंदोलनानंतर प्रशासन जागेवर!
मुख्य वनसंरक्षक निलेश सोनवणे यांनी आंदोलनाचे मुख्य प्रा. पंढरी पाठे व आंदोलकांशी चर्चा करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. चौकशीत रेंज फॉरेस्ट ऑफिसर अमर सिडाम आणि त्यांच्या संबंधित कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित होईल आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

आंदोलनाच्या प्रमुख मागण्या:
✔️ यवतमाळमध्ये वन्यजीव उपचार केंद्र तातडीने सुरू करावे.
✔️ रॅपिड रेस्क्यू टीममध्ये अनुभवी वन्यजीव रक्षक आणि सर्पमित्रांचा समावेश करावा.
✔️ सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्रे (ID Card) तातडीने द्यावीत.
✔️ वनक्षेत्राच्या घटण्याच्या कारणांची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
✔️ टिपेश्वर अभयारण्यात भोंगळ कारभार थांबवून,वनसंवर्धनासाठी ठोस पावले उचलावीत.

उद्याचा निर्णायक टप्पा – प्रशासनासमोर मागण्यांची लढाई!
25 मार्च रोजी डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर (DFO) यांच्यासोबत विशेष बैठक होणार आहे.या बैठकीत मागण्यांवर निर्णय घेतला जाणार असून,वनविभागाच्या कारभारावर गंभीर चर्चा होणार आहे.
त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील सर्व वन्यजीव प्रेमींची बैठक रेड्डी सरांच्या मार्गदर्शनाखाली होईल, जिथे पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

संघर्षाचे नेतृत्व आणि उपस्थित कार्यकर्ते:
हे आंदोलन कृषी तथा वन्यजीव अभ्यासक प्रा.पंढरी पाठे आणि कॉम्रेड सचिन मनवर,निलेश मेश्राम,प्रज्वल तुरकाने यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
यावेळी उपस्थितांमध्ये शुभम तेलगोटे,महेश शेळके,गट्टू भगत,दिनेश पिंपरे,आदित्य गणवीर, प्रथमेश जाधव,सचिन कोकणे,नंदन चव्हाण,विद्या परचाके,वैष्णवी मडावी, त्रिवेणी मेश्राम,त्रिशुला चपारिया,मोहन मुरखे,अजित गजभिये,सत्यम डोंगरे, विनोद दोंदल,प्रतीक तरळकर,अंकित पवार,पृथ्वीराज चव्हाण,वनसंवर्धनासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

कोट—
गर्भवती माकडीणीचा मृत्यू हा वनविभागाच्या अपयशाचे प्रतीक आहे.प्रशासनाने जागे होऊन तातडीने सुधारणा करावी,अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल!
प्रा.पंढरी पाठे(कृषी तथा वन्यजीव अभ्यासक)