मुंबई – सर्व्हर समस्येमुळे गेल्या आठ दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानांमधून रेशनचे वाटप करण्यास अडचण निर्माण होत होती. रेशन वाटपाच्या येणाऱ्या अडचणी लक्षात घेत ऑफलाइन धान्य देण्यास मान्यता देण्यात आली आहे. IMPDS पोर्टलवरील unautomated सुविधेमार्फत ऑफलाईन अन्नधान्य वाटपास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत आपल्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
राज्यात काही दिवसापासून रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशिनमधून अन्नधान्य वितरण करतांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे शासनाच्या निर्दशनास आले आहे. या तांत्रिक समस्येमुळे अन्नधान्य वितरण ऑफलाईन करण्यास मान्यता देण्याची विनंती क्षेत्रीय कार्यालयांनी केली होती. सर्व्हरमध्ये झालेल्या समस्येमुळे राज्यातील अनेक नागरिक रेशनच्या धान्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. राज्यातील अनेक भागांमधून नागरिकांनी याबाबत तक्रारी दिल्या होत्या. त्याचबरोबर अन्नधान्य वितरण करणाऱ्या दुकानदारांनीही याबाबतीत तक्रारी मांडल्या होत्या. त्यानुसार विभागाने बैठक घेऊन यावर तात्काळ उपायोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार केंद्र सरकारशी चर्चा करून ऑफलाइन अन्नधान्य वितरण करण्यास आज परवानगी देण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने अपवादात्मक परिस्थितीमध्ये ऑफलाईन धान्यवाटप करण्याकरीता राज्यातील रास्तभाव दुकानदारांचे लॉगिन IMPDS पोर्टलवर तयार करण्यात आले असून ज्या रास्तभाव दुकानांचे लॉगिन IMPDS पोर्टलवर तयार करण्यात आले नसतील, अशा दुकानांचे लॉगीन तात्काळ तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सर्व्हरशी संबंधित तांत्रिक अडचणीचे निराकरण होईपर्यंत एक विशेष बाब म्हणून ऑफलाईन धान्य वितरणास परवानगी देण्यात येत आली आहे. ऑफलाईन अन्नधान्याचे वितरण शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात यावे व त्यांनी त्याबाबतच्या नोंदी प्रमाणित कराव्यात. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांस अन्नधान्य वितरीत करण्याची सर्व जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी/अन्नधान्य वितरण अधिकारी/उपनियंत्रक शिधावाटप यांची राहील.
कितीही तांत्रिक समस्या विभागापुढे निर्माण झाल्या तरी देखील राज्यातील एकही नागरिक हा धान्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी आपण दक्ष आहोत. त्यामुळे नेहमीप्रमाणेच प्रत्येक नागरिकाच्या घरात धान्य पोचवले जाईल. अन्नधान्य वाटपाबाबत काही अडचणी किंवा तक्रार असल्यास संबंधित नागरिकांनी नजीकच्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात संपर्क साधावा.