Home यवतमाळ सत्ताधा-यांनी मंत्रालयात दलाली करण्यापेक्षा शेतीच्या बांधावर यावे….

सत्ताधा-यांनी मंत्रालयात दलाली करण्यापेक्षा शेतीच्या बांधावर यावे….

142
शेतक-यांना वा-यावर सोडल्याने देवानंद पवार यांचा संताप
प्रतिनिधी यवतमाळ
या वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे जिल्हयातील हजारो एकर वरील कपाशी व सोयाबीन चे पिके वाहून गेली. येलो मोझॅक रोग आल्यामुळे सोयाबीन चे पिक जवळपास संपुष्टात आले, तर सततच्या पावसामुळे शिल्लक राहीलेल्या कपाशीलाही बोंडे लागली नाही. आता शेवटच्या टप्प्यात उरलेसुरले कापसाचे तसेच तुरीचे पिक अवकाळी पावसाने नष्ट केले आहे. याशिवाय गव्हाला सुध्दा फटका बसला आहे. एकीकडे शेतकरी संकटात असतांना सत्ताधारी मात्र मंत्रालयात दलाली करीत असल्याचे चित्र दिसत आहे. या अवकाळी पावसाने शेतकरी उदध्वस्त झाला असून सरकारने तातडीने पंचनामे करुन मदत द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरुन सरकारची लक्तरे शेतीच्या बांधावर टांगु असा इशारा प्रदेश कॉग्रेसचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी दिला आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना पिक विम्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. राज्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा झाली आहे. मात्र, काहींसाठी ही रक्कम म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिक विमा कंपनीकडून थट्टा केली जात आहे का, असा प्रश्न देवानंद पवार यांनी उपस्थित केला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात 2 रुपये, 5 रुपये, 35 रुपये अशी तुटपुंजी मदत खात्यात जमा करण्यात आली आहे. सरकारचे डोके ठिकाणावर असते तर अशी मदत वाटप झाली नसती. आता गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने तर उरलेसुरले कापसाचे पिक संपुष्टात आले आहे. तुरीसह गव्हाचे सुध्दा नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने वेळ न घालविता तातडीने पंचनामे करण्याची मागणी देवानंद पवार यांनी केली आहे. शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे तसेच उत्पादन खर्च वाढल्याने शेती नुकसानीची ठरत आहे. त्यामुळे कापसाला 12 हजार तसेच सोयाबिनला 8 हजार रुपये हमीभाव घोषीत करावा. शेतक-यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असतांना सरकार मात्र याकडे गंभीरतेने बघायला तयार नाही. जिल्हयात दुष्काळ जाहिर करण्यासोबतच शेतक-यांना तातडीने मदत न दिल्यास हातात सोटे घेऊन सत्ताधा-यांना प्रसाद देऊ. त्या पार्श्वभूमिवर घाटंजी येथे दिनांक 30 नोव्हेंबर रोजी दुपारी सोटे मोर्चा आयोजित केला असून या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन सुध्दा देवानंद पवार यांनी केले आहे.
सरकारचे लक्ष्मीदर्शन
राज्यातील शेतक-यांकडे लक्ष दयायचे सोडून सरकार लक्ष्मीदर्शनात मग्न आहे. लवकरच लोकसभेच्या तसेच त्या पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने सरकार पैसे जमा करण्यात व्यस्त आहे. सर्व सत्ताधारी मंत्रालयात बसून दलाली करीत आहे. जनतेमधील विश्वास गमावल्यामुळे फक्त पैशाच्या जोरावर निवडणूका जिंकण्याची स्वप्ने सत्ताधारी बघत आहे. संकटात शेतक-यांना वा-यावर सोडल्याने येणा-या निवडणुकीत शेतकरी सत्ताधा-यांना आपली जागा दाखवतील अशी टिका सुध्दा देवानंद पवार यांनी केली आहे.