Home विदर्भ ९४ हजाराचा सुगंधित तंबाखु, पानमसाल्याचा साठा जप्त…

९४ हजाराचा सुगंधित तंबाखु, पानमसाल्याचा साठा जप्त…

109

अन्न व औषध प्रशासन विभागाची कार्यवाही…

रवि माळवी

यवतमाळ , दि. ०४ :- कळंब येथे आरोपीच्या घराची तपासणी केली असता घरामध्ये ९४ हजार २६६ रुपयांचा सुगंधीत तंबाखु, पानमसाल्याचा लपवून ठेवलेला साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून जप्त केला. ही कारवाई दिनांक ३ फेब्रुवारी रोजी करण्यात आली.
सैय्यद इमरान सैय्यद मेहमुद रा.शहीद अब्दुल हमीद चौक, वार्ड क्र.४, कळंब असे आरोपीचे नाव आहे. दिनांक ३ फेब्रुवारी रोजी अन्न व औषध प्रशासनामार्फत प्रतिबंधित अन्नपदार्थ बाबत विशेष मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिमेंतर्गत कळंब येथील आरोपीच्या घराची तपासणी केली असता त्याचेकडे ९४ हजार २६६ रुपये किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा आढळून आला. सदर सर्व साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी सं.ए.सुर्यवंशी, अन्न सुरक्षा अधिकारी, यवतमाळ, ताथोड अन्न सुरक्षा अधिकारी, अकोला व प्र.नि.काळे, अन्न सुरक्षा अधिकारी, अकोला यांच्या संयुक्त पथक तसेच सु.ग.अन्नापुरे, सह आयुक्त (अमरावती), अन्न व औषध प्रशासन, अमरावती व कृ.रं.जयपुरकर, सहायक आयुक्त (अन्न), यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी यांनी केली.

जनआरोग्याचा विचार करता याप्रकारची धडक मोहिम यापुढेही सतत सुरु राहील. गुटखा, पानमसाला, सुगंधित/ स्वादिष्ट तंबाखु, सुगंधित/ स्वादिष्ट सुपारी व खर्रा इत्यादी प्रतिबंधित पदार्थाची उत्पादन, वितरण, साठवण व विक्री होत असल्याचे आढळल्यास त्याबाबत प्रशासनास माहिती देवून प्रशासनास गुटखाबंदी प्रभावीपणे अमलात आणणेकामी सहकार्य व जनतेने, विशेषत: युवा वर्गाने अशा पदार्थाचे सेवन करुन नये असे आवाहन सु.ग.अन्नापुरे, सह आयुक्त (अमरावती विभाग) व कृष्णा जयपुरकर, सहायक आयुक्त (अन्न) यवतमाळ यांनी केले आहे.