Home यवतमाळ पार्डी (नस्करी) ग्रामपंचायतीत पाच लाख बहात्तर हजार रुपयाचा अपहार झाल्याचा मुख्य कार्यकारी...

पार्डी (नस्करी) ग्रामपंचायतीत पाच लाख बहात्तर हजार रुपयाचा अपहार झाल्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या चौकशी अहवालात नमूद..!

170

➡️ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीधर पांचाळ यांचे चौकशी अहवालात दोषारोप.

➡️ उपसरपंच गौरव साखरकर व इतर ग्रामपंचायत सदस्यांची लेखी तक्रार.

(अयनुद्दीन सोलंकी )
————————
घाटंजी :- घाटंजी तालुक्यातील पार्डी (नस्करी), चोरंबा (नुक्ती) व भांबोरा येथील ग्रामसेवक महेश अरविंद मंचलवार विरुद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणुक) नियम 1967 मधील नियम 3 चा भंग केलेला असल्याने मंचलवार हे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम 1964 च्या नियम 3 व 4 कार्यवाही करण्यास पात्र असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे.

घाटंजी तालुक्यातील पार्डी (नस्करी) येथील घन कचरा व्यवस्थापन करिता प्राप्त अनुदान 5 लाख 72 हजार दिनांक 06/02/2021 रोजी सरपंच ग्रामपंचायत पार्डी (नस्करी) खाते क्रमांक 001611101100002 मध्ये शासनाकडुन अनुदान देण्यात आले. परंतु ग्रामसेवक महेश मंचलवार यांनी सदर प्राप्त निधीची कामे न करता क्रमांक 1 ते 24 नुसार निधिचा अपहार करुन नमुना नं. 5 (रोखवहीत) चुकीचा खर्च नोंदवुन 5,72,000 रुपयाचा अपहार केल्याचे चौकशीत आढळुन आले आहे. याबाबत पार्डी (नस्करी) येथील निलेश चव्हाण व इतर एक यांनी लेखी तक्रार केली होती.

तसेच तालुक्यातील चोरंबा अंतर्गत नुक्ती येथील पिण्याच्या पाणी टंचाई अंतर्गत विहीर बोअर अधिग्रहण ठराव क्रमांक 7 दिनांक 25 एप्रिल 2022 नुसार घेतला. त्या नंतर नुक्ती येथील ग्रामस्थ पाणी टंचाई बाबत दिनांक 20 मे 2022 रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना निवेदन दिले होते. परंतु चोरंबा (नुक्ती) येथील ग्रामसेवक महेश मंचलवार हे नुक्ती येथील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू असल्या बाबत चा खोटा अहवाल सादर करुन त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ठेवला आहे.

सदर दोषारोपपत्रात दिनांक 19 मे 2022 व 20 मे 2022 रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी चोरंबा (नुक्ती) व भांबोरा येथील ग्रामपंचायतीला 28 फेब्रुवारी 2021 रोजी भेट दिली असता, मंचलवार हे मुख्यालयी वास्तव्यास नसुन गैरहजर आढळुन आले.

अशा प्रकारे ग्रामसेवक महेश मंचलवार यांनी नियम 3 चा भंग केल्या प्रकरणी त्यांची खाते निहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. ग्रामसेवक महेश मंचलवार विरुद्ध घाटंजीच्या तत्कालीन गट विकास अधिकारी सोनाली माडकर, तत्कालीन पंचायत विस्तार अधिकारी पी. डी. रणमले, पंचायत विस्तार अधिकारी बी. एस. बाहेकर व प्रभारी पंचायत विस्तार अधिकारी गुणवंत विरदंडे आदी साक्षीदार म्हणून तपासण्यात येणार आहे.
====================
दरम्यान, पार्डी (नस्करी) येथील ग्रामपंचायत उपसरपंच गौरव साखरकर यांची प्रतिक्रिया घेतली असता, पार्डी (नस्करी) येथील सरपंच व सचिवांच्या संयुक्त खात्यातुन 5,72,000 हजार रुपये कामें न करताच काढण्यात आल्याने त्यांचे विरुद्ध अपहाराची पुर्ण रक्कम वसुल करुन त्यांचे विरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपसरपंच साखरकर यांनी केली आहे.
====================

तथापि, पार्डी (नस्करी) ग्रामपंचायत येथील गैरप्रकार प्रकरणी जिल्हा स्तरावर लेखी तक्रार झाल्याने पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा प्रकल्प संचालक श्रीमती लता मोहीते यांनी घाटंजी येथील गट विकास अधिकारी महेश ढोले यांना सदर प्रकरणात सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. मात्र, अद्यापही घाटंजी पंचायत समिती कडुन कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, हे येथे उल्लेखनीय.

सद्यातरी ग्रामसेवक महेश मंचलवार हे आर्णी पंचायत समितीत कार्यरत असल्याचे वृत्त आहे.