यवतमाळ – माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून बघितले जाते. मात्र माध्यमकर्मींच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत. याकडे लक्ष वेधण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून गुरुवारी दिनांक 11 मे रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. यवतमाळसह जिल्हाभरात हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्याला भरीव निधी द्यावा, पत्रकारितेत पाच वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेला जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरांसाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण ‘क’ वर्ग दैनिके (लघू दैनिक) यांना मारक आहे. लघू दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात, आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, यात सहभागी होण्याचे आवाहन व्हाइस ऑफ मीडिया, यवतमाळच्या वतीने करण्यात आले आहे.