
मनिष गुडधे………..
अमरावती- पदवीधर मतदार संघात मतमोजणी दरम्यान अस्वस्थ वाटल्याने घरी परत गेल्यानंतर हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मंडळ अधिकार्याचा मृत्यू झाला. गुरुवार ( ता. २) फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा ते आकराच्या दरम्यान ही घटना घडली.
शाहूराज चैतुजी खडसे ( वय ५५ वर्ष, रा. ग्रेटर कैलासनगर, अमरावती) असे मृत मंडळ अधिकारी यांचे नाव असल्याचे राजापेठ पोलिसांनी सांगितले. गत ३० तासांपासून बडनेरा मार्गावरील नेमानी इन गोडाऊन परिसरात अमरावती पदवीधर मतदार संघासाठी झालेल्या मतदानानंतर गुरुवार सकाळपासूनच मतमोजणी सुरू होती.
त्याकरिता व्यवस्थेत तैनात अधिकारी कर्मचाऱ्यांची ड्युटी बुधवारी रात्रीपासूनच लागली. त्यात श्री खडसे सुद्धा बुधवारपासूनच तैनात होते. असे नातेवाईकांनी सांगितले. ड्युटीवर असताना रात्री अस्वस्थ वाटायला लागले त्यामुळे त्यांनी सायंकाळी घरी परत जाण्याचा निर्णय घेतला.
जेवण केल्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याने नातेवाईकांनी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान खडसे यांचा मृत्यू झाल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.










































