Home विदर्भ … अखेर गुरांचा बाजार सुरु होण्याचा मार्ग सुकर जिल्ह्यात १२ कृषी उत्पन्न...

… अखेर गुरांचा बाजार सुरु होण्याचा मार्ग सुकर जिल्ह्यात १२ कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत भरतो गुरांचा बाजार जिल्हाधिका-यांच्या निर्णयाने शेतकरी व पशुपालकांना दिलासा

115

अमरावती / मनिष गुडधे . जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालकांनी रेटून धरलेल्या मागणीला यश आले असून, ऑगस्ट २०२२ पासून लॅम्पची आजाराच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून बंद करण्यात आलेले गुरांचे बाजार पुन्हा सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी निर्गमित केले. त्यामुळे आता जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सर्व गुरांचे बाजार सुरु करण्याची वाट मोकळी झाली असल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त संजय वानरे यांनी दिली. यामुळे जिल्हाभरातील शेतकरी व पशुपालकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

गोवंशीय जनावरांमधील लंपी आजाराचा प्रादुर्भाव नियंत्रणात असून, डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात 97.73 टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे नियंत्रित क्षेत्रातील संक्रमित नसलेल्या व लसीकरण झालेल्या जनावरांच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी निर्गमित केला. लंपी प्रतिबंधासाठी गोवंशीय गुरे व म्हशी यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यास मनाई करण्यात आली होती. तथापि, आता सर्वदूर लसीकरण झाल्याने व आजाराचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने परवानगी देण्यात आली. त्यामुळे नियंत्रित क्षेत्रातील संक्रमित नसलेल्या जनावरांची जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या वाहतुकीसाठी सक्षम प्राधिका-याचे आरोग्य प्रमाणपत्र तेवढे अनिवार्य आहे.

शर्यतीसाठी परवानगी आवश्यक
गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशींचा बाजार भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. तथापि, प्राण्यांच्या शर्यती आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची पूर्व परवानगी आवश्यक राहील.

बाधित जनावरांसाठी मनाई कायम
त्याचप्रमाणे, म्हशी वगळता अन्य बाधित असलेल्या गोजातीय प्रजातीच्या कोणत्याही जिवंत किंवा मृत गुरांच्या संपर्कात आलेली वैरण, निवा-यासाठी वापरलेले गवत, शव, कातडी, अन्य साहित्य कुठेही नेता येणार नाही. तसेच, म्हशी वगळता अन्य बाधित गुरांना बाजारात, जत्रेत, प्रदर्शनात किंवा अन्य प्राण्यांच्या कळपात आणण्यास मनाई करण्यात आली आहे. म्हशींमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव न आढळल्याने म्हशींना या आदेशातून वगळण्यात आल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरूषोत्तम सोळंके यांनी स्पष्ट केले.