Home यवतमाळ खापरी येथील जिजाऊ प्राथमिक आश्रम शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक व जिल्हा परिषद उच्च...

खापरी येथील जिजाऊ प्राथमिक आश्रम शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक व ईतरांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करुन तपास करण्याचे घाटंजी न्या‌‌यालयाचे आदेश..!

364

घाटंजी बातमीदार

घाटंजी : तालुक्यातील खापरी येथील जिजाऊ प्राथमिक आश्रम शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापकासह ईतरांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करुन तपास करण्याचे आदेश घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्याय न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात यांनी घाटंजी पोलीसांना दिले आहे. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार घाटंजी पोलीसांनी अद्यापही एफ.आय.आर. दाखल केला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सदर प्रकरणात फिर्यादी अक्षय हरिदास विरदंडे यांचे कडुन ॲड. गणेश धात्रक यांनी न्यायालयात बाजू मांडली.

घाटंजी तालुक्यातील खापरी गावातील विद्यार्थ्यांचे नांव खापरी येथील जिजाऊ प्राथमिक आश्रम शाळा व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा या दोन्ही शाळेत एकाच वेळी दर्शवुन हजेरी पटानुसार एकच विद्यार्थी दोन्ही शाळेत नमुद करुन शासकीय अनुदान लाटुन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी जिजाऊ प्राथमिक आश्रम शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक एस. आर. सरमुकदम, प्रभारी मुख्याध्यापक घोगले व सहाय्यक शिक्षिका कु. एस. जी. चौधरी विरुद्ध भादंवि कलम ४१७, ४२०, ४६७, ४६८, ४७० व सह कलम ३४ अंतर्गत गुन्हे नोंदविण्याचे आदेश घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात यांनी घाटंजी पोलीसांना दिले आहे. विशेष म्हणजे तक्रारदार अक्षय विरदंडे यांनी सदर प्रकरणात अगोदर घाटंजी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. मात्र, घाटंजी पोलीसांनी दखलपात्र गुन्हा असतांना सुद्धा एफ.आय.आर. नोंदवला नाही. तदनंतर उप विभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा, पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचे कडे तक्रार नोंदवली. सदर प्रकरणात नियमानुसार गुन्हे दाखल न झाल्याने अखेर फिर्यादी अक्षय विरदंडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलमानुसार घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात खटला दाखल केला. सदर प्रकरणात ॲड. गणेश धात्रक यांनी युक्तिवाद केला. मात्र, गुन्हे दाखल करुन तपास करण्याचे आदेश घाटंजी न्यायालयाचे असतांना सुद्धा अद्यापही घाटंजी पोलीसांनी गुन्हे दाखल केले नाही. त्यामुळे घाटंजी पोलीसांविषयी संभ्रम निर्माण होत आहे.

दरम्यान, घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनिष दिवटे यांच्याशी संपर्क केला असता, सदर प्रकरणात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असुन लवकरच एफ.आय.आर दाखल करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक शशीकांत नागरगोजे यांचेशी संपर्क केला असता, घाटंजी येथील न्यायालयाने चौकशी करून एफ आय आर दाखल करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.

सदर प्रकरणाची पुढील चौकशी घाटंजी पोलीस हे करित आहे.