
उपसरपंच पदाच्या निवडणुकीत मोघे, तोडसाम, योगेश पारवेकर गटाचे आरेवार पारवेकर गटात कां?

( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी : घाटंजी तालुक्यातील सर्वात मोठी व अत्यंत महत्वाची समजल्या जाणाऱ्या पारवा ग्रामपंचायत उपसरपंचाच्या निवडणुकीत माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर गटाच्या सात ग्रामपंचायत सदस्याच्या पाठींब्याने उपसरपंच पदी संजय लक्ष्मण आरेवार यांची सहा मताने दुसरयांदा निवड करण्यात आली.
नुकत्याच पारवा ग्रामपंचायतची निवडणुक माजी आमदार जवाहर त्रेंबक उर्फ अण्णासाहेब देशमुख पारवेकर गट आणि माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे, माजी आमदार प्रा. राजु तोडसाम, माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख पारवेकर यांच्या गटात चुरशिची निवडणुक झाली. यात मोघे, तोडसाम, योगेश पारवेकर गटाच्या सरपंच पदी सौ. संगीता देवराव मडावी ह्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत निवडुन आल्या होत्या.
सदरची निवडणूक दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेची होती. या निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद यांचा पुरेपूर वापर करून हि निवडणुक अतिशय प्रतिष्ठेची करण्यात आली होती. तरी देखील माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर गटाच्या कुशल नेत्रुत्वाखाली पारवा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सचिन देशमुख पारवेकर, घाटंजी पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहास देशमुख पारवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली. उपसरपंच पदाच्या निवडणुकीत यावेळी संजय आरेवार यांना दहा, तर माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे, माजी आमदार प्रा. राजु तोडसाम व योगेश देशमुख पारवेकर यांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार ग्रामपंचायत सदस्य बालाजी पोटपेल्लीवार यांना केवळ चारच मतांवर समाधान मानावे लागले. या मुळे पारवा ग्रामपंचायत उपसरपंच पदाच्या निवडणुकीत संजय आरेवार हे सहा मतांनी दुसरयांदा विजयी झाले. त्यांना अण्णासाहेब पारवेकर गटाचे सात मते मिळाली, हे विशेष. उपसरपंच पदाच्या निवडणुकीत उपसरपंच पदी संजय आरेवार हे निवडुन आल्याने पारवा परिसरातील राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.











































