Home यवतमाळ यवतमाळात प्रथमच ई-वेस्ट संकलन मोहीम…!

यवतमाळात प्रथमच ई-वेस्ट संकलन मोहीम…!

235

 

प्रयास यवतमाळ व यवतमाळ प्लॉगर्सचा पुढाकार
(जास्त ई-वेस्ट साठी प्रशस्तीपत्रके)

यवतमाळ (प्रतिनिधी) : यवतमाळ शहरात पहिल्यांदाच ई-वेस्ट (इलेक्ट्रॉनिक कचरा) संकलित करण्याची सेवाभावी मोहीम सुरू होत आहे. प्रयास यवतमाळ आणि यवतमाळ प्लॉगर्स यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्ताने या पर्यावरणपूरक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सामाजिक कार्यक्रमाचा प्रचार, प्रसार, विस्तार शाळा, कॉलेज, संस्था, बँका, कार्यालये, दुकाने, उद्योजक, हॉस्पिटल्स आदींच्या माध्यमातून सुरू झाला आहे. या उपक्रमात 100 किलोपेक्षा जास्त ई-वेस्ट देणार असलेल्यांकडून थेट त्यांचे जागेवर जाऊनच हा ई कचरा आयोजकांकडून जमा करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त ई-वेस्ट देणाऱ्या व्यक्ती, संस्था, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, कार्यालय, बँक, व्यापारी प्रतिष्ठान, समूह आदींना 31 जुलैला मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
28 ते 30 जुलै दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत नगर परिषद कार्यालयाच्या वाहनतळ येथे यवतमाळकरांकडून ई-वेस्ट स्वीकारल्या जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक, बॅटरीवर चालणारी उपकरणे, संगणक संबंधितचे सर्व साहित्य, टिव्ही, मोबाईल, शीतकरण यंत्रे, माहिती तंत्रज्ञान आधारित वस्तू आदी ई-वेस्टमध्ये येतात.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि शासनाची नोंदणी व परवानगी असलेल्या संस्था आणि कंपनीच्या मार्फत नियमानुसार या ई कचऱ्याचे रिसायकल होणार आहे.
वातावरण, जल, वायू, मातीसह समस्त पर्यावरण दूषित करणारा हा ई-कचरा आरोग्यासही हानिकारक आहे. या घातक कचऱ्याचे उच्चाटन करण्यासाठी सर्व वयोगटातील यवतमाळकरांनी आवर्जून व स्वयंस्फूर्त सहभाग घ्यावा तसेच अधिक माहिती व नोंदणीसाठी 9850316211/8275554451 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजक संस्थांनी केले आहे.