
अतिक्रणधारकांच्या जागेच्या मोजणीसाठी वाघमारे यांचे आंदोलन, वंचीतचा जाहीर पाठिंबा.
यवतमाळ ( प्रति – नेताजी नगर येथील रहिवाश्यांना हक्काचा जमिन पट्टा मिळण्याच्या प्रकरणात स्थानिक भुमि अभिलेख खात्याने आपल्या ढिसाळ कारभारानुसार अक्षम्य दिरंगाईचे धोरण अवलंबिले आहे. त्याविरोधात स्थानिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. निरज वाघमारे यांनी आमरण उपोषण आरंभिले असुन आतातरी संबंधित विभागाच्या कारभारात सुधारणा व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
यवतमाळ-दारव्हा मार्गावर फार वर्षांपूर्वी नेताजी नगर ही जुनी लोकवस्ती वसली असुन येथील रहिवासी बांधवांना हक्काचा पट्टा मिळावा म्हणून गेल्या अनेक वर्षाचा लोकलढा यशस्वी झाला. शासनाने ही जमीन रहिवाशांना राहण्यासाठी मोकळी केली असुन तसे निर्देश संबंधितांना निर्गमित केले. असे असतानाही भुमि अभिलेख खात्याच्या ढिसाळ धोरणामुळे एक वर्ष उलटून गेले तरी मोजणीचे काम रखडले आहे. याबाबत स्थानिक नागरिकांच्या वतीने डॉ. निरज वाघमारे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे जागामोजनी होत नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.
मोलमजुरी करून जिवन व्यतित करणाऱ्या समाजबांधवांना न्याय मिळावा व आर्थिक अपहारासाठी प्रसिद्ध असलेल्या भुमि अभिलेख खात्याचा दुटप्पीपणा शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी त्यांनी मंगळवार दिनांक २४ मे २०२२ पासुन आमरण उपोषण सुरु केले आहे.
त्यांच्या या लोकाभिमुख आंदोलनास नेताजी नगर वासियांचा भरभक्कम पाठिंबा लाभत असुन यात मुख्यतः वंचित बहुजन आघाडी कडून पाठिंबा दर्शविला आहे.समाजहिताच्या कार्यासाठी सुरू केलेल्या या लढयात वंचीत बहुजन आघाडी डॉ. वाघमारे यांच्या सोबत नेहमी असेल अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोढगे यांनी दिली.











































